वेंगुर्ला : बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व जिमखाना विभागाच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. धनराज गोस्वामी होते, तर प्रा. सदाशिव चुकेवाड हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रो. डॉ. धनराज गोस्वामी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर प्रकाश टाकताना सांगितले की, विद्यार्थ्यांकडे केवळ ‘उद्याचे नागरिक’ म्हणून न पाहता आजच्या समाजाचे निर्णायक शिल्पकार म्हणून पाहिले पाहिजे. युवक हा समाजातील सर्वाधिक गतिमान, सर्जनशील व परिवर्तनक्षम घटक असून शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून चारित्र्याचा विकास होय. सुजाण व चारित्र्यवान नागरिक बनून देशाला प्रगतीपथावर नेण्याचा ध्यास घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख वक्ते प्रा. सदाशिव चुकेवाड यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना सांगितले की, ते लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे व जिज्ञासू वृत्तीचे होते. त्यांनी पाश्चात्य जगाला भारतीय संस्कृती व वेदांताची खरी ओळख करून दिली आणि केवळ धर्मावर नव्हे, तर मानवाच्या उद्धारावर भर दिला.
राजमाता जिजाऊ यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या काळात स्त्रियांना शिक्षण मिळणे कठीण होते, त्या काळात जिजाऊंनी युद्धकला व राज्यकारभारात प्राविण्य मिळवून एक आदर्श मातृशक्तीचे उदाहरण निर्माण केले.
या कार्यक्रमास प्रा. डी. बी. राणे, प्रा. एस. एच. माने यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विवेक चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सुनिता जाधव यांनी मानले.



