अखेर व्हायचं तेचं झालं, तळवडेत ‘स्थानिक’ विरुद्ध ‘बाहेरचा’ जोरदार सामना रंगणार! ; भाजपाचे दोन्ही ‘गावडे’ एकमेकांना आव्हान देणार!
- ✍️ रूपेश पाटील.
- सावंतवाडी : जेव्हापासून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत निवडणुका जाहीर झाल्या तेव्हपासून सर्वात जास्त कळीचा मुद्दा राहिला आहे तो म्हणजे तळवडे मतदार संघ. येथे सुरुवातीपासूनच भाजपाचे युवा नेते संदीप गावडे यांनी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत या संघातून निवडणूक लढवायची आहे, या उद्देशाने विविध सामाजिक उपक्रमांचा धडाका लावला. मात्र येथील भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची अंतर्गत घुसमट सुरूच होती. त्याचाच परिपाक आज दिसून येत आहे.
- भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषद निवडणुकीत तळवडे मतदार संघातून स्थानिक उमेदवार डावलून बाहेरील उमेदवार लादल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या प्रवृत्तीला विरोध म्हणून निरवडे गावचे माजी सरपंच तथा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. आता तळवडे मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा पाहावयास मिळत आहे. प्रमोद गावडे हे सावंतवाडीच्या पंचायत समिती माजी सभापती सौ. प्रियांका गावडेंचे पती असून प्रमोद गावडेंना मानणारा येथे मोठा वर्ग आहे. त्यात शिवसेना देखील याठिकाणी इच्छुक होती. मात्र, भाजपला ही जागा गेल्यानं शिवसैनिक कोणती भूमिका घेणार?, याकडेही लक्ष लागून राहिले आहे. “आज वेळ कमी आहे, पुढे तुम्हाला प्रत्यक्ष भेटून पुढील निर्णय घेऊ”, अशी भावना श्री. गावडे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपच्या संदीप गावडेंसमोर मात्र आता तगडं आव्हान उभं राहणार आहे.
- यामुळे भाजपात बंडखोरी निर्माण झाली असून हे बंड शांत करण्यासाठी नेत्यांना लक्ष घालावं लागणार आहे. मात्र, स्थानिकांना डावलल्याने प्रमोद गावडेंनी बंडखोरी केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रमोद गावडे यांचे सहकार क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात वाखाणण्याजोगे योगदान राहिले आहे. अशातच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे संदीप गावडे यांच्याविरुद्ध प्रमोद गावडे यांनी केलेले बंडखोरी शमण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून नक्कीच प्रयत्न केले जाणार आहेत. आता प्रमोद गावडे यांचे हे बंड शमविण्यात स्थानिक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना कितपत यश मिळते?, हे नजीकच्या काळात कळणार आहे. मात्र तूर्तास भारतीय जनता पार्टीचे दोन तुल्यबळ ‘गावडे’ एकमेकांच्या समोर उभे टाकले आहेत, याची चर्चा संपूर्ण जिल्हाभर रंगू लागली आहे.
- Advertisement -
error: Content is protected !!