दोडामार्ग : तालुक्यातील तेरवण गावातील खराब झालेले विद्युत खांब बदलण्याबाबत महावितरणकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. तेरवण गावातील वीज खांब व त्यावरील तारा सध्या जीर्ण अवस्थेत असून सुरक्षिततेच्या दृष्टीने ते बदलणे आवश्यक असल्याचे महावितरणच्या पाहणीत निष्पन्न झाले आहे.
तेरवण गावाला कोल्हापूर जिल्ह्यातील 33/11 के.व्ही. पाल उपकेंद्रातून वीजपुरवठा होत असून गावात दोन वीज रोहित्रे आहेत. सध्या गावात लघुदाब वाहिनीवर एकूण 13 पोल असून त्यापैकी 13 पोल बदलण्याची आवश्यकता आहे. यासोबतच खांबावरील तारा स्पेसर बसविण्याचे कामही प्रस्तावित आहे.
या कामासाठी अंदाजे 6 लाख 79 हजार 600 रुपये खर्च अपेक्षित असून तांत्रिक मंजुरीसाठी प्रस्ताव विभागीय कार्यालय, कुडाळ येथे पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारामार्फत काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या भेडशी शाखा कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
या कामामुळे तेरवण गावातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित व सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



