वेंगुर्ले : नुकत्याच पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तुळस गटामध्ये सर्व राजकीय पक्षांना मागे टाकून एक सामान्य गृहिणी विजयी झाली हे लोकशाही सजग असल्याचे मुर्तिमंत ऊदाहरण असल्याचे वेंगुर्ले परिसरात बोलले जात आहे.
तुळस गटातून मातब्बर शिवसेना शिंदे आणि शिवसेना ऊबाठा यांच्या ऊमेदवारांना शह देऊन तुळस मधील सौ. सुजाता अजित पडवळ या विजयी झाल्या. सतत जनसंपर्क आणि जनसामान्यांपर्यंत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारी एक महिला म्हणून सौ. सुजाता पडवळ यांची ओळख आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाकडून हल्लीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार ही प्राप्त झाला होता. गोरगरीबांच्या अडिअडचणी वेळी आपले स्वास्थ्य, परिस्थिती चा विचार न करता धावणारी महिला असा तुळस वेंगुर्ले परिसरात सौ.सुजाता पडवळ यांचा लौकिक होताच. त्यामुळे जनता त्यांच्या मागे होतीच. पण किंबहुना समाजसेवकांमागे असणारी जनता मतपेटीपर्यंत पोहोचत नाही असा असणारा समज सौ.सुजाता पडवळ यांच्याबाबतीत खोटा ठरला. फार मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी उतरले आणि त्यांनी आपल्यातला एक उमेदवार निवडून दिला अशी सर्वत्र चर्चा आहे. सौ.सुजाता पडवळ यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी विनम्रपणे विजयाचे श्रेय त्यांच्यावर विश्वास ठेवणार्या मतदार बंधुभगिनिना दिले, त्याचबरोबर जनतेने जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी अखंडपणे कार्य करत राहण्याचे आश्वासन सौ.सुजाता पडवळ यांनी दिले.



