सावंतवाडी : राष्ट्रहित प्रथम त्यानंतर इतर साऱ्या गोष्टींचा विचार करा!, राष्ट्राच्या हितापुढे साऱ्या गोष्टी गौण आहेत. म्हणून राष्ट्रहिताला नेहमी प्राधान्य दिले गेले पाहिजे. हे पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांचे संस्कार निरंतर जपण्याची आज गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात समर्पण दिवस साजरा करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी युवा नेते विशाल परब बोलत होते.
सर्वप्रथम भाजपा युवानेते विशाल परब यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सहसंयोजक केतन आजगांवकर यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याची महती विषद केली व कार्याचे स्मरण केले. यावेळी भाजपा युवानेते विशाल परब, सहसंयोजक केतन आजगांवकर, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, आजगाव शक्ती केंद्र प्रमुख ओंकार प्रभू, गिरीष परब, बंड्या दळवी, भाजपा राज्य सोशल मिडिया प्रमुख अविनाश पराडकर आदी उपस्थित होते.



