सर्वांनी एकत्र येऊन समाजाभिमुख काम करूया! : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे आवाहन. ; नकुल पार्सेकर लिखित ‘ध्येयधुंद’ पुस्तकाचे दिग्गजांच्या उपस्थितीत मुंबईत हाऊसफुल्ल प्रकाशन.

मुंबई :  “मी नेहमी आश्चर्यचकित होतो की माझ्यासारख्या लहान माणसाच्या हातून एवढी कामे कशी काय होऊ शकतात? तेव्हा लक्षात येते की कुठे ना कुठे तरी एक दैवी शक्ती आहे, जी तुमच्याकडून असे काहीतरी चांगले काम करून घेत असते. म्हणूनच आपण सर्वांनी एकत्र येऊया आणि समाजाभिमुख कार्य करूया. ती दैवी शक्ती तेव्हा निश्चितच आपल्या पाठीशी उभी असेल”, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे केले.

सुरेश प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारित नकुल पार्सेकर लिखित ध्येयधुंद या पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात हाऊसफुल गर्दीत संपन्न झाले. त्यावेळी प्रभू यांनी आतापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी साथसोबत केली त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या शानदार सोहळ्याला सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, ज्येष्ठ सनदी लेखापाल प्रफुल्ल छाजेड, कालनिर्णयचे कार्यकारी संचालक संचालक जयराज साळगावकर, नाबार्डचे संचालक सतीश मराठे, शैलेश हरिभक्ती, जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे, स्वामीराज प्रकाशनच्या विपणन विभागप्रमुख अल्पा शाह, वर्धमान श्रुतगंगा ट्रस्टचे प्रमुख संजय शाह हे मान्यवर उपस्थित होते.सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण होते. या प्रकाशन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रफितीद्वारे शुभेच्छा दिल्या.
सुरेश प्रभू यांनी अध्यक्षपदाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांमुळेच सारस्वत बँक आज एका मोठ्या टप्प्यावर आल्याचे सांगून गौतम ठाकूर यांनी आपल्या भाषणात सुरेश प्रभू यांच्या निर्णयक्षमतेचे विविध पैलू उलगडून दाखवले.
रवींद्र चव्हाण यांनी प्रभू यांचा “परीस” असा गौरव करून त्यांच्या कार्यस्पर्शाने अनेक क्षेत्रांना नवी दिशा मिळाल्याचे आवर्जून नमूद केले.
सुरेश प्रभू यांनी कधीही स्वतःबद्दल किंवा आपल्या कामाबद्दल गाजावाजा केला नाही. ते खऱ्या अर्थाने जागतिक दृष्टी असलेले नेते आहेत, अशा शब्दात सर्वच मान्यवरांनी प्रभू यांच्या कार्याचे कौतुक केले.
पुस्तकाचे लेखक नकुल पार्सेकर यांनी प्रभू यांचा मी कार्यकर्ता आहे ही ओळख मला ऑक्सफर्ड पदवीपेक्षा अधिक मोठी वाटते असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अमेय देसाई यांनी केले.

यावेळी संजय शाह यांनी या पुस्तकाची संस्कृत भाषेतील आवृत्ती प्रसिद्ध करायला निश्चित आवडेल असे सांगितले. तर अशोक परब यांनी स्वामीराज प्रकाशनच्या मराठी भाषा व सांस्कृतिक, सामाजिक कार्याचा आढावा घेतला. स्वागत समितीचे मोहन होडावडेकर यांनी आभार मानले.


हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वागत समितीचे सदस्य रविंद्र वाडेकर, योगेश प्रभू, संजीव कर्पे आदिनी विशेष मेहनत घेतली.
या सोहळ्याला गानचंद्रिका पद्मजा फेणाणी, डॉ. संजय देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि सिंधुदुर्ग,रत्नागिरी,पालघर,नाशिक, मुंबई, ठाणे,पुणे,रायगड आदि महाराष्ट्राच्या विविध भागातून रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles