स्व. दिनकर धारणकर सरांची स्मृती जपणारा महोत्सव म्हणजे उद्योन्मुख कलाकारांच्या स्वप्नांना पंख देणारे प्रभावी व्यासपीठ! : भाजपा युवा नेते विशाल परब. ; ‘क्षितिज नाट्यमहोत्सव २०२६’चे विशाल परब यांच्याहस्ते दिमाखदार उद्घाटन!

सावंतवाडी : सावंतवाडी नगरीतील सांस्कृतिक अवकाशाला नवसंजीवनी देणारा स्व. दिनकर धारणकर स्मृती “क्षितिज नाट्यमहोत्सव 2026” (बालनाट्य) हा रंगतदार उपक्रम सावंतवाडी नगरपरिषद आणि क्षितिज इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने बॅ. नाथ पै बहुउद्देशीय सभागृह येथे उत्साह, टाळ्यांचा कडकडाट आणि कलारसिकांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.
या बहुप्रतीक्षित नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. दीपप्रज्वलनाने प्रारंभ झालेल्या या सोहळ्यात बालकलाकारांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता आणि पालकांच्या डोळ्यांतील अभिमान स्पष्ट जाणवत होता.
उद्घाटन प्रसंगी विशाल परब यांनी आपल्या ओजस्वी आणि प्रेरणादायी भाषणातून बालकलेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “रंगभूमी ही केवळ करमणुकीचे साधन नसून ती व्यक्तिमत्त्व घडवणारी विद्यापीठे आहेत. बालपणात रुजलेली कला, संस्कार आणि संस्कृती यांची बीजेच पुढे सक्षम समाजाची पायाभरणी करतात. आजच्या डिजिटल युगात मुलांनी मोबाईलच्या पडद्यापेक्षा रंगमंचाचा पडदा उघडावा, आत्मविश्वासाने संवाद साधावा आणि आपल्या मातीतल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, ही काळाची गरज आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “स्व. दिनकर धारणकर यांची स्मृती जपणारा हा महोत्सव म्हणजे केवळ नाट्यस्पर्धा नाही, तर भावी कलाकारांना दिशा देणारे, त्यांच्या स्वप्नांना पंख देणारे एक प्रभावी व्यासपीठ आहे. अशा उपक्रमांमुळे सावंतवाडीची सांस्कृतिक परंपरा अधिक समृद्ध होईल.”


यावेळी नगरसेविका दिपाली भालेकर, निलम नाईक, सुनीता पेडणेकर, ऍड. सिद्धार्थ भांबुरे (स्वीकृत नगरसेवक), केतन आजगावर (भाजपा सोशल मीडिया प्रमुख, सावंतवाडी मंडल), धीरेंद्र म्हापसेकर (शहर चिटणीस), समीर कुडाळकर, हर्षवर्धन धारणकर, सी. ए. लक्ष्मण नाईक तसेच पत्रकार संतोष सावंत आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
संपूर्ण सभागृहात बालकलाकारांच्या अभिनयाची झलक, रंगमंचावरील सर्जनशीलता आणि संस्कारांची सांगड यामुळे वातावरण भारावून गेले होते. “क्षितिज नाट्यमहोत्सव 2026” हा उपक्रम खऱ्या अर्थाने बालकलेला नवे क्षितिज देणारा आणि संस्कारांना नवी दिशा देणारा ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles