सावंतवाडी : बाळाच्या निधनामुळे नैराश्यात असलेल्या एका २१ वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना माजगाव (गरड) येथे घडली. सौ. प्रीती प्रल्हाद केतकर (पूर्वाश्रमीची तनुजा मनोहर बागडी) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी, मूळची कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड (दुंडगे) येथील असलेल्या प्रीती यांचा विवाह एप्रिल २०२५ मध्ये झाला होता. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. मात्र, अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाचा २५ जानेवारी २०२६ रोजी निमोनियाने मृत्यू झाला. पोटच्या गोळ्याच्या निधनामुळे प्रीती या प्रचंड मानसिक धक्क्यात आणि निराशेखाली होत्या.
याच नैराश्यातून २० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० ते ६:३० च्या दरम्यान, घरात कोणीही नसताना त्यांनी बेडरूममधील पंख्याला ओढणीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. याबाबतची माहिती नारायण विठोबा बागडी (वय ३५, रा. मोपा, गोवा) यांनी पोलिसांना दिली.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सपोनि पंकज शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर हे अधिक तपास करीत आहेत.
नातेवाईकांच्या उपस्थितीत पंचनामा-
मयत प्रीती या नवविवाहिता असल्याने, त्यांचे माहेरचे नातेवाईक चंदगड येथून आल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार श्रीमती तारी यांनी शासकीय पंचांच्या आणि महिला पोलीस उपनिरीक्षकांच्या उपस्थितीत मृतदेहाचा पंचनामा केला. आज (दि. २१) शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.



