‘जिथे भाव तिथे देव’ ही उक्ती आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलो आहोत. पण आज सावरवाडच्या पवित्र भूमीत जेव्हा ‘शिव आणि शक्ती’चा अनोखा संगम स्फटिक शिवलिंगाच्या रूपाने साकारला आहे, तेव्हा श्रद्धेपेक्षा वादाचेच आवाज अधिक घुमताना दिसत आहेत. उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर होणारी भस्म आरती आणि कामाख्या देवीच्या स्त्री तत्त्वाची पूजा… हे समीकरण म्हणजे सावरवाडला लाभलेले एक आध्यात्मिक वरदान आहे. नुकत्याच झालेल्या महाशिवरात्रीला ३५,००० भाविकांनी घेतलेली हजेरी ही केवळ गर्दी नव्हती, तर ती या स्थानाप्रती असलेल्या अढळ विश्वासाची साक्ष होती.
निसर्गाच्या कुशीत वसलेले आपले सावरवाड आज एका ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशामुळे संपूर्ण भारताच्या नकाशावर ठळकपणे चमकत आहे. देशातील सर्वात मोठे स्फटिक शिवलिंग आपल्या गावात असणे, ही केवळ भाग्याचीच नाही तर साक्षात ईश्वरी आशीर्वादाची खूण आहे. ज्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी देशाच्या ,राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्रद्धेने येतात, तेच शिवलिंग काही लोकांसाठी मात्र केवळ विरोधाचा विषय ठरावे, हे दुर्दैव आहे.
विकासाची दारे की अज्ञानाचा अंधार?
कोणत्याही भागाचा विकास हा तिथल्या पर्यटन आणि पर्यटकांच्या ओघावर अवलंबून असतो. आज या स्फटिक शिवलिंगामुळे गावातील छोट्या व्यावसायिकांची दुकाने चालत आहेत, लॉजिंग-बोर्डिंगच्या माध्यमातून रोजगार मिळतोय आणि वाहतूक व्यवस्थेला गती मिळाली आहे. थोडक्यात, हे मंदिर गावाच्या आर्थिक समृद्धीचा कणा बनले आहे. असे असतानाही, ‘गावात दुसरे शिवलिंग नको’ हा अट्टाहास धरणे म्हणजे प्रगतीच्या वाटेत स्वतःच दगड रचण्यासारखे आहे.

आरोपांची चिखलफेक आणि वास्तव –
विरोध करणाऱ्यांकडून अघोरी कृत्य, अनैतिक प्रकार किंवा अंमली पदार्थांचे खोटे आरोप केले जात आहेत. पण वास्तव काय आहे? हे मंदिर २४ तास उघडे असते, तिथे साधे दरवाजेही नाहीत आणि संपूर्ण परिसर CCTV च्या निगराणीखाली आहे. जिथे पारदर्शकता आणि भक्तीचा संगम आहे, तिथे असे निराधार आरोप करणे म्हणजे केवळ खोडसाळपणा नाही, तर गावाची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. आणि काही खरंच घडत असेल तर अगदी रस्त्यावरून कितीशा अंतरावर मंदिर आहे मग आपले पोलीस प्रशासन काय सहज सोडतील का..??मुळात साप साप म्हणून भुई थोपटण्यात काय हशील.

अभिमान बाळगा, तिरस्कार नको! –
ज्या स्फटिकाच्या तेजाकडे पाहून मन प्रसन्न होते, त्या तेजाचा स्वीकार करण्याऐवजी आपण विरोधाची काजळी का धरत आहोत? शेकडो मैलांवरून येणारा पर्यटक जेव्हा विचारतो की “हे सावरवाड कुठे आहे?”, तेव्हा आपली मान अभिमानाने वर व्हायला हवी. ही वास्तू म्हणजे केवळ दगड किंवा स्फटिक नाही, तर ती सावरवाडची नवी ओळख आहे.
वेळ आली आहे संकुचित विचार सोडून एकत्र येण्याची. विरोधाची अघोरी प्रवृत्ती सोडून, गावाच्या विकासासाठी आणि या पवित्र वारशाच्या जतनासाठी आपण सर्वांनी ‘एक’ व्हायला हवे. सावरवाडचे नाव आज भक्तीसाठी घेतले जातेय, ते उद्या विरोधासाठी ओळखले जाऊ नये, इतकीच माफक अपेक्षा!
विरोध करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, आपण विरोध नक्की कोणाला करत आहोत? त्या पाषाणाला की त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला? इतिहासाची पाने उलटली तर लक्षात येईल की, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या अभेद्य सिंधुदुर्ग किल्ल्यांनंतर आपण भव्य असं काय निर्माण केलंय, जिथे जनसागर लोटेल? शिर्डीच्या साईबाबांनी एका छोट्याशा गावाला जागतिक नकाशावर आणलं, तिथल्या विमानतळापर्यंत प्रगतीची झेप घेतली.कदाचित या स्फटिक शिवलिंगामुळे चिपीच्या विमानतळाला देखील भविष्यात सोनेरी दिवस दिसतील.. शेगावचे गजानन महाराज मंदिर असोत, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर किंवा पंढरीचा पांडुरंग—या देवस्थानांनी केवळ धर्म टिकवला नाही, तर संपूर्ण परिसराचा कायापालट केला. हजारो हातांना काम दिलं आणि स्थानिक तरुणांना सक्षम केलं.
मग सावरवाडच्या बाबतीत आपली वृत्ती संकुचित का? जर या स्फटिक शिवलिंगामुळे पंचक्रोशीचा चेहरामोहरा बदलणार असेल, स्थानिक युवकांच्या स्वप्नांना पालवी फुटणार असेल, तर अडथळ्यांचे दगड कशासाठी? देव हा चराचरात आहे, तो कोणाच्याही विरोधाने नष्ट होऊ शकत नाही. ‘देऊळ बंद’ चित्रपटात आपण पाहिलंय, देवाला कुलूप लावणं शक्य नसतं, कारण तो माणसाच्या हृदयात वास करतो.
विरोधकांनी सत्यता पडताळून पाहावी. आज जर आपण या आध्यात्मिक आणि आर्थिक क्रांतीला खोडा घातला, तर उद्याची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. साक्षात भोलेनाथांच्या या रूपाला विरोध करण्याची कोणाची ‘बिशाद’ आहे?
श्रद्धेच्या या महाकुंभात अडथळा आणण्यापेक्षा, विकासाच्या या गंगेत सहभागी होणे हेच काळाची गरज आहे. सावरवाडचे हे स्फटिक शिवलिंग भविष्यात केवळ भक्तीचे केंद्रच नाही, तर या मातीचा अभिमान ठरेल, हे निश्चित!
हर हर महादेव!
लेखक – अजिंक्य कृष्णा पाताडे.
7498119697
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️



