सावंतवाडी : न्यायासाठी आणि आपल्या हक्कासाठी सुरू केलेल्या उपोषणादरम्यान गर्भवती असलेल्या उपोषणकर्त्या वैभवी साटेलकर यांची तब्येत अचानक खालावल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना तातडीने सावंतवाडी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
जागतिक महिला दिनाच्या दिवशी मौजे साटेली तर्फ सातारा येथील ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर वैभवी साटेलकर यांनी सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. न्याय मिळावा या एकाच आशेवर त्या उपोषणाला बसल्या होत्या.
दरम्यान दुपारनंतर जिल्ह्यातील डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटनेचे विविध तालुक्यांतील प्रतिनिधी व सहकारी त्यांची भेट घेण्यासाठी आले. त्यांनी साटेलकर यांना नैतिक पाठिंबा देत त्यांच्या संघर्षाला साथ असल्याचे सांगितले. मात्र दुपारी चारच्या सुमारास गर्भवती असलेल्या साटेलकर यांची प्रकृती अचानक बिघडली. उपोषणामुळे अशक्तपणा वाढल्याने उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली आणि तातडीने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.
आई होण्याच्या उंबरठ्यावर असलेली एक महिला आपल्या हक्कासाठी एवढ्या टोकाला जावी लागणे, ही बाब अनेकांच्या मनाला चटका लावणारी ठरली आहे. रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान या प्रकरणाची सुनावणी मंगळवार, दि. १० मार्च रोजी घेण्यात येणार असल्याचे पत्र गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी साटेलकर यांना पाठविले आहे.
आता सर्वांचे लक्ष मंगळवारी होणाऱ्या या सुनावणीकडे लागले असून जिल्हा प्रशासन आणि सावंतवाडी पंचायत समिती प्रशासन या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचेच उत्सुकतेने लक्ष लागले आहे.
एका आईच्या आणि एका कर्मचाऱ्याच्या न्यायाच्या लढ्याला अखेर न्याय मिळणार का, हा प्रश्न आता सर्वांच्या मनात घर करून राहिला आहे.



