इराण – अमेरिका युद्ध पार्श्वभूमीवर सर्वोदय नगरमध्ये आज विश्वशांतीसाठी प्रार्थना! ; नागरिकांना उपस्थित राहण्याचे सर्वोदय नगर रहिवासी संघाचे आवाहन.

सावंतवाडी : सध्या सुरू असलेल्या इराण – अमेरिका युद्धाच्या भीषण परिणामांची झळ संपूर्ण जगाला बसत असून विशेषतः युद्धग्रस्त भागातील निरपराध लहान मुलांची मानसिक अवस्था अत्यंत चिंताजनक बनली आहे. या वेदनादायी परिस्थितीची जाणीव ठेवत सर्वोदय नगर रहिवाशांच्या वतीने विश्वशांतीसाठी एकत्र येऊन सामूहिक प्रार्थना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या अनुषंगाने आज बुधवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता सर्वोदय नगर येथील गार्डनमध्ये विश्वशांतीसाठी विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आली आहे. या प्रार्थनेत सहभागी होताना प्रत्येकाने मेणबत्ती घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
युद्धामुळे उद्ध्वस्त होणारी मानवी मूल्ये, भीतीच्या सावटाखाली जगणारी निष्पाप बालके आणि अनिश्चिततेत अडकलेले सामान्य नागरिक यांचा विचार करता ही प्रार्थना केवळ एक कार्यक्रम नसून मानवतेच्या भावनेतून व्यक्त होणारी सामूहिक हाक असल्याची भावना रहिवाशांमध्ये व्यक्त होत आहे.
सर्वोदय नगरमधील सर्व पुरुष, महिला तसेच विशेषतः लहान मुलांनी वेळात वेळ काढून या विश्वशांती प्रार्थनेत सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती आयोजक समितीकडून करण्यात आली आहे. एकत्र येऊन शांततेसाठी प्रार्थना करत मानवतेचा संदेश देऊया, अशी भावनिक साद सर्वोदय नगर रहिवासी संघाच्यावतीने देण्यात आली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles