✍🏻 गुढीपाडवा‼️
हिंदू वर्षातील पहिला सण अर्थात ‘गुढीपाडवा’. हिंदू वर्षारंभाचा प्रारंभदिवस ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.
गुढीपाडवा :
साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.
गुढीपाडव्याचे महत्त्व :
अ} नैसर्गिक महत्त्व : वसंत ऋतूच्या प्रारंभाचा दिवस. ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय ) आणि वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
ब} ऐतिहासिक महत्त्व : १. श्रीरामाने वालीचा वध केल्याचा दिवस. २. शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात् गुढीपाडवा. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला. ही गुढीपाडवा हा वर्षारंभ साजरा करण्यामागील ऐतिहासिक कारणे आहेत.
क} आध्यात्मिक महत्त्व : १. सृष्टीची निर्मिती म्हणजेच सत्ययुगाच्या प्रारंभाचा दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. २. गुढीपाडवा हा पृथ्वीचा वर्षारंभदिन. ‘गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित झालेली असते. ३. प्रजापति-संयुक्त लहरी पृथ्वीवर जास्त प्रमाणात येतात.
गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती :
१. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करावे. अभ्यंगस्नान करतांना देशकालकथन करतात.
२. स्नानानंतर आम्रपल्लवांची तोरणे सिद्ध करून प्रत्येक द्वाराशी लाल फुलांसहित बांधावी; कारण लाल रंग शुभदर्शक आहे.
३. प्रथम नित्यकर्म देवपूजा करतात. ‘वर्षप्रतिपदेला महाशांती करायची असते. शांतीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाची पूजा करतात; कारण या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली.
४. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून सूर्योेदयाच्या वेळी शास्त्रशुद्ध गुढी उभारली जाते.
५. याचकांना अनेक प्रकारची दाने द्यावीत, उदा. पाणपोईद्वारा उदकदान. याने पितर संतुष्ट होतात. ‘धर्मदान’ हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे शास्त्र सांगते. सध्याच्या काळात धर्मशिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे.
६. ज्योतिषाचे पूजन करून त्याच्याकडून किंवा ‘उपाध्याकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात् वर्षफल श्रवण करतात.
७. पंचागश्रवणानंतर कडुनिंबाचे मिश्रण वाटायचे असते. या चूर्णामध्ये कडुलिंबाची पाने, फुले, मिरी, हिंग, मीठ, ओवा, साखर इत्यादी पदार्थ चूर्ण करून ते चिंचेत कालवून भक्षण करावे.
८. या दिवशी भूमीत नांगर धरावा.
९. नाना प्रकारची मंगल गीते, वाद्ये आणि पुण्यपुरुषांच्या कथा ऐकत हा दिवस आनंदाने घालवावा.



