सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात इंग्रजी मराठी कवी लेखक कोकणचे सुपुत्र डॉ. अनिल जिजाबाई सरमळकर लिखित बहुचर्चित व संपूर्ण साहित्य वर्तुळात उत्सुकता निर्माण केलेले Enemy of America या इंग्रजी पुस्तकाची भारतीय आवृत्ती मुंबई येथे प्रकाशित होत आहे.
या पुस्तकाची पहिली अमेरिकन आवृत्ती 2024 च्या नाताळला Aberox पब्लिकेशनद्वारे न्यूयॉर्क येथे प्रकाशीत झाली आहे.
सदर पुस्तकाने तेथील साहित्य वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण केली असून तेथील अनेक मान्यवर लेखक विचारक समीक्षक हळूहळू Enemy of America बद्दल आपले अभिप्राय व्यक्त करीत आहेत.
त्याचप्रमाणे युरोप व भारतातही या पुस्तकाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसत आहे.

या संदर्भात लेखक अनिल यांना विचारले असता ते म्हणाले “हे पुस्तक अमेरिकेत प्रसिद्ध होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. अशा प्रकारचे लेखन खुद्द अमेरिकेत प्रसिद्ध करणे हे एक धाडस होते ते माझे प्रकाशक आणि मित्र अँथनी मॉरिस यांच्यामुळे शक्य झाले आहे.
मी इथे भारतात असूनही त्यांनी पुस्तकाला योग्य न्याय दिला आहे आणि बलगेरिया व कॅनडा या युरोपीय देशात तेथील साहित्य वर्तुळात चर्चा घडवून आणण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे.
एक धाडसी व विचारवंत प्रकाशकच हे करु शकतो. त्यांना Enemy of America ही संकल्पनाच खूप अपील झाली होती.

पुढे अनिल सरमळकर यांनी सांगितले की ‘ मी गेली विस वर्षे हे पुस्तक मनात, डोक्यातच लिहीत होतो परंतु प्रत्यक्षात ते लिहायला फार वेळ लागला नाही. माझी लेखन प्रक्रिया अशीच आहे एकाचवेळी वेगवेगळी पुस्तके संकल्पना डोक्यात काम करत असतात अनेक वर्षे हे सुरु असते आणि प्रत्यक्ष लिहिणे मग तशी स्थिती निर्माण झाली की सुरु होते.
Enemy of America हे या आणि आगामी भीषण युगाचे एक भाष्य आहे. हे पुस्तक एक स्टार पुस्तक असून ते वादळी असे खळबळजनक पुस्तक आहे आणि त्याचा साहित्यिक दर्जा उच्च असून त्यातील प्रायोगिकता आणि आधुनिक उत्तर – आधुनिक लेखनाची सामर्थ्यवान वैशिष्ट्य त्यात प्रतीत झाली आहेत असे ज्येष्ठ अमेरिकन लेखकांचे अभिप्राय या पुस्तकाला प्राप्त झाले आहेत.
दरम्यान डॉ. अनिल सरमळकर यांचे The Fox Septology मधील नियोजित चौथे असलेले The Last Flicker हे इंग्रजी नाटकही लवकरच मुंबई येथे Horizon प्रकाशनाद्वारे प्रसिद्ध होत आहे.
आपल्या दर्जेदार इंग्रजी लेखनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने दखलपात्र ठरलेल्या डॉ. अनिल सरमळकर यांनी Enemy of America या पुस्तकाद्वारे जागतिक साहित्याच्या स्तरावर एक साहित्यिक वैचारिक धाडस केले असून या पुस्तकाचे प्रमोशन आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्याचा घेतलेला धाडसी निर्णय या बद्दल लेखक अनिल जिजाबाई सरमळकर यांचे अभिनंदन होत आहे.



