निरवडेत भरवस्तीतील वराह पालन, निरवडे ग्रामस्थांचा टाहो ! दुर्गंधीच्या विळख्यात आरोग्य धोक्यात! : संजू परब यांचा प्रशासनाला कडक इशारा. ; पालकमंत्र्यांचेही वेधणार लक्ष!

सावंतवाडी : तालुक्यातील निरवडे गावात भरवस्तीत सुरू असलेल्या वराह पालन व्यवसायामुळे निर्माण झालेल्या असह्य दुर्गंधीने ग्रामस्थांचे जगणे अक्षरशः हैराण झाले असून आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडे धाव घेतली.

भरवस्तीत व्यवसाय ; ग्रामस्थांचे जगणे असह्य –
वस्तीच्या मध्यभागी सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे डुक्करांच्या विष्ठेचा तीव्र दुर्गंध संपूर्ण परिसरात पसरत असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतेचा अभाव, वाढता माशा-डासांचा प्रादुर्भाव आणि संभाव्य आजारांचा धोका यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सहा महिन्यांचा पाठपुरावा; कारवाई मात्र शून्य –
आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “व्यवसाय करणे चुकीचे नाही; मात्र त्यातून इतरांच्या आरोग्यावर घाला येता कामा नये,” अशी ठाम भूमिका संजू परब यांनी यावेळी व्यक्त केली.

पालकमंत्र्यांकडे तक्रारीचा इशारा –
या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे तातडीने तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. “जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी राजू धुमाळ, विलास नाईक, प्रतीक्षा पारकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या गंभीर प्रश्नावर प्रशासन कोणते ठोस पाऊल उचलते, याकडे संपूर्ण निरवडे गावाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles