सावंतवाडी : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या पाठीशी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते ठामपणे उभे आहोत. उबाठाचे काही पदाधिकारी कुणाकडूनतरी पैसे घेऊन आंदोलन करत असून त्यांच्या आंदोलनामुळे केसरकरांच महत्त्व कमी होणार नाही असं मत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, उबाठाचे लोक केसरकरांच्या विरोधात विधान करतायत, आंदोलन करत आहेत. हीच माणसं काही वर्षांपूर्वी केसरकरांच्या भाकरीवर उदरनिर्वाह करत होती. आज तीच माणसं नाहक टीका करत आहेत. कुणाकडूनतरी पैसे घेऊन ही आंदोलने केली जात आहेत. दीपक केसरकर हे चार वेळा निवडून आले असून मंत्रीही झालेत. ते देवभक्त असून प्रत्येक देवळात ते जातात. केवळ फोटो आहे म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हे चुकीचं आहे. केसरकर यांना सावंतवाडीची जनता ओळखून आहे. त्यांचे वर्तन समाजाला माहित आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठिशी असून उबाठाच्या लोकांचा आम्ही निषेध करतो. त्यांचेही नेते तिथे गेले होते, उद्धव ठाकरेंनी खरातला पाणी दिल्याचा टोलाही श्री. परब यांनी हाणला.
दरम्यान, पकडून आणलेली माणसं उबाठाच्या आंदोलनात असून मतदारसंघातील महिला दीपक केसरकर यांच्या पाठीशी आहेत. भोंदूबाबा अशोक खरात यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे असे ॲड. निता सावंत-कविटकर यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, क्लेटस फर्नांडिस, गुंडू जाधव, राकेश पवार, संजय गावडे आदी उपस्थित होते.



