कुडाळ एमआयडीसीच्या विकासाला मोठी चालना! ; रस्त्यांसाठी २७ कोटींच्या निधीला मंजुरी. ;

कुडाळ : मालवण – कुडाळ मतदारसंघातील औद्योगिक विकासाला गती देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कुडाळ एमआयडीसी परिसरातील प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरण आणि बळकटीकरणासाठी तब्बल २७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. आमदार नितेश राणे यांच्या मागणी व पाठपुराव्यामुळे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेमुळे हे शक्य झाले आहे.
कुडाळ औद्योगिक वसाहतीतील वाढत्या उद्योगांच्या गरजा लक्षात घेता सुमारे ७.५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण व बळकटीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये एमआयडीसी जंक्शन ते पिंगुळी हायस्पेकर तिठा तसेच एमआयडीसी जंक्शन ते नवीन एमआयडीसी मार्ग पाट जंक्शन या प्रमुख अंतर्गत मार्गांचा समावेश आहे.
यापूर्वी कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रीय महामार्ग ते एमआयडीसी जंक्शन या मार्गाचे दुहेरीकरण व मजबुतीकरण १८ कोटी रुपये खर्चून पूर्ण करण्यात आले होते. आता या नव्या टप्प्यामुळे संपूर्ण औद्योगिक परिसरासाठी दर्जेदार व अखंड रस्ते जाळे उपलब्ध होणार आहे.


या प्रकल्पामुळे विशेषतः पिंगुळी हायस्पेकर तिठा येथे होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. हा रस्ता विकसित झाल्यामुळे एमआयडीसी ते विमानतळ असा थेट आणि सुलभ कॉरिडॉर तयार होईल, ज्याचा फायदा उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला होणार आहे.
या निर्णयामुळे कुडाळ एमआयडीसी औद्योगिक नकाशावर अधिक भक्कम होईल, तसेच रोजगार निर्मिती व स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल. कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला हे मोठे यश मानले जात आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी या निर्णयाबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र वीज उपकेंद्राच्या मागणीचाही पाठपुरावा सुरू असून, त्यास लवकरच सकारात्मक संकेत मिळत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles