सावंतवाडी: बाकरवाडी येथे श्री देव वंशेश ब्राह्मण मंदिराचा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. श्री देव वेतोबा सातेरी, श्री देव गिरोबा सातेरी आणि श्री देव वंशेश ब्राह्मण यांच्या कृपेने संपन्न झालेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसरात आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तीचा दरवळ निर्माण केला.
मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित श्री सत्यनारायण महापूजेला भाजपचे युवा व दमदार नेते विशाल परब यांनी विशेष उपस्थिती दर्शवत देवदर्शन घेतले. त्यांनी महापूजेचा लाभ घेत श्री चरणी नतमस्तक होत परिसराच्या प्रगती, सुख-समृद्धी आणि शांततेसाठी मनोभावे प्रार्थना केली.
या मंगल प्रसंगी परिसरातील नागरिक, भक्तगण आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. संपूर्ण वातावरण ‘जय देव’च्या घोषणांनी आणि धार्मिक उत्साहाने भारावून गेले होते.
विशाल परब यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत मंदिर ट्रस्टच्या सामाजिक व धार्मिक कार्याचे मनापासून कौतुक केले. स्थानिक नागरिकांनीही त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करत कार्यक्रमाला अधिक रंगत आणली.
एकूणच, श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम असलेला हा वर्धापन दिन सोहळा बाकरवाडीच्या इतिहासात संस्मरणीय ठरला.



