वेंगुर्ला : कोकणातील ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि थरार यांचे अनोखे दर्शन घडविणारी आरवली सखेलखोल येथील पारंपरिक बैलगाडा शर्यत आज जल्लोषात पार पडली. महाराष्ट्र भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या दमदार उपस्थितीने या स्पर्धेची रंगत अधिक खुलली असून संपूर्ण मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
श्री देव वेतोबा, सातेरी, भुमैया कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य शर्यतीत तब्बल पन्नासहून अधिक बैलगाड्यांनी सहभाग घेतला. धावत्या बैलगाड्यांच्या चाकांमधून उडणारी माती, बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा नाद आणि प्रेक्षकांच्या जल्लोषपूर्ण आरोळ्यांनी सखेलखोलचा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता.

या पारंपरिक शर्यतीचे उद्घाटन आरवलीचे जेष्ठ ग्रामस्थ रघुवीर मंत्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले, तर युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते फित कापून स्पर्धेला दिमाखदार सुरुवात झाली. ग्रामीण क्रीडा परंपरा जपणाऱ्या अशा उपक्रमांना सदैव पाठबळ देण्याची भूमिका विशाल परब यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धक आणि ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साह संचारला होता.
यावेळी आरवली सरपंच शेखर कुडव, तलाठी गावडे, मयुर आरोलकर, श्रीकांत राजाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील सर्वाधिक आकर्षण ठरली ती पावशी येथील वाटवे यांच्या मालकीची बैलजोडी. अवघ्या १ मिनिट ७ सेकंदांत ६०० मीटर अंतर पूर्ण करत या जोडीने मैदान गाजवले आणि उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला.
ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या या बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. परंपरा, वेग आणि जल्लोष यांचा संगम अनुभवताना सखेलखोल परिसर आज अक्षरशः उत्सवमय झाला होता.



