पत्रकारांच्या हक्काच्या घरांना पालकमंत्री नितेश राणेंची गॅरंटी! ; ‘सिंधुदर्पण’ गृहनिर्माण प्रकल्पाचे जल्लोषात भूमिपूज. ; “राणेसाहेबांनी जोडलेली माणसं जपणं आणि विकासाचा वारसा पुढे नेणं हीच माझी जबाबदारी.” : मंत्री नितेश राणे.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागले असून, पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘सिंधूदर्पण’ पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. पत्रकारांच्या घराच्या प्रश्नाला प्राधान्य देत “हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची संपूर्ण जबाबदारी माझी,” अशी ठाम ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिली.
ओरोस येथील सिंधुदुर्ग नगरीत उभारण्यात येणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ इमारतींचा समूह नसून पत्रकारांच्या संघर्षमय आयुष्याला सुरक्षित निवाऱ्याची दिलेली हमी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार, मान्यवर आणि नागरिकांच्या टाळ्यांच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, “सिंधुदुर्गच्या जनतेने राणे कुटुंबावर कायम प्रेम केले. त्या प्रेमामुळेच आम्हाला राज्य आणि देशात ओळख मिळाली. राणेसाहेबांनी मुख्यमंत्री, मंत्री आणि पालकमंत्री म्हणून हजारो लोकांचे संसार उभे केले. त्यांनी जोडलेली माणसं टिकवणं आणि विकासाचा वारसा पुढे नेणं हेच आमचं ध्येय आहे.”
पत्रकारांविषयीची आत्मीयता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “पत्रकार मित्रांची इच्छा होती की त्यांच्यासाठी दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प व्हावा. त्यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य करण्याची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे. हा प्रकल्प वेळेत, उत्कृष्ट दर्जासह आणि पत्रकारांच्या अपेक्षांनुसार पूर्ण केला जाईल.”


यावेळी त्यांनी खास शैलीत केलेले विधानही चर्चेचा विषय ठरले. “आमच्याकडे आउटगोइंग फ्री आहे आणि इनकमिंग बंद आहे… म्हणजे काही घेण्याचा विषयच नाही. लोकांच्या अडचणी सोडवणं हेच आमचं काम आहे,” असे म्हणत त्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी जनतेसाठी संवेदनशील राहण्याची गरज अधोरेखित केली.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त शरद पाबळे, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, ‘सिंधूदर्पण’ गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन संतोष राऊळ, सचिव दिलीप खडपकर, गणेश जेठे, संतोष वायंगणकर, शशी सावंत, शेखर सामंत, गजानन नाईक, सागर चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यामुळे सोहळ्याला सामाजिक आणि भावनिक रंगही लाभला.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रकल्पाच्या प्रशासकीय प्रक्रियेची माहिती देताना सांगितले की, “काही कारणांमुळे हा प्रकल्प रखडला होता; मात्र २०२३-२४ नंतर त्याला गती मिळाली. राज्यात पत्रकारांसाठी अशा स्वरूपाचा प्रकल्प उभारणारा सिंधुदुर्ग हा पहिलाच जिल्हा ठरत आहे.”
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी या प्रकल्पाचे संपूर्ण श्रेय पालकमंत्री नितेश राणे यांना देत, “हा प्रकल्प राज्यासाठी आदर्श ठरेल आणि पत्रकारांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण करेल,” असे गौरवोद्गार काढले.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पत्रकारांच्या एकजुटीचे कौतुक करताना, “पत्रकार हे केवळ व्यावसायिक नात्याने नव्हे तर कुटुंबाप्रमाणे जोडलेले आहेत. हा प्रकल्प अनेक कुटुंबांच्या आयुष्यात स्थैर्य आणि सुरक्षितता निर्माण करेल,” असे नमूद केले.
भूमिपूजनाचा हा सोहळा केवळ एका प्रकल्पाची सुरुवात नसून, पत्रकारांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीचा ऐतिहासिक टप्पा ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles