✍️ साबाजी परब.
सावंतवाडी : “डेंग्यूसारख्या गंभीर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ प्रशासन नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेले पाणी हटवणे आणि नियमित ‘ड्राय डे’ पाळणे हीच डेंग्यूविरोधातील प्रभावी लस आहे,” असे प्रभावी प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ विविध जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. डेंग्यू प्रतिबंध, स्वच्छता आणि लोकसहभाग याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी तथा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर, पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, ग्रामपंचायत सदस्य आत्माराम गावडे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बांदाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमोद कामत यांनी डेंग्यूमुक्तीसाठी जनतेने सजग राहण्याचे आवाहन करताना सांगितले की, “डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता हा सर्वात मोठा उपाय आहे. आपल्या घरातील छोट्या निष्काळजीपणामुळे डेंग्यूसारखा आजार फैलावू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून समाजालाही जागरूक करणे आवश्यक आहे.”
याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र बांदाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक मागण्या तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. औषध पुरवठा, आरोग्य केंद्र दुरुस्ती, बांधकाम आणि इतर प्रलंबित प्रश्न जिल्हा परिषदेमार्फत प्राधान्याने मार्गी लावले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर यांनी डेंग्यू आजाराबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, “एडिस इजिप्ती हा डास स्वच्छ साचलेल्या पाण्यात वाढतो. त्यामुळे घर, गच्ची, अंगण किंवा परिसरात पाणी साचू देऊ नये. ताप, अंगदुखी, डोकेदुखी किंवा अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून उपचार घ्यावेत.”
सरपंच प्रियांका नाईक यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी परिचर आणि सफाईगार उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रमोद कामत यांचे विशेष आभार मानले.
कार्यक्रमस्थळी गप्पी मासे, डासांच्या अळ्या, डास प्रतिबंधक द्रावणे तसेच विविध जनजागृती साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. ग्रामस्थांनी या प्रदर्शनाची पाहणी करून डेंग्यू प्रतिबंधाबाबत माहिती घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सहाय्यक शंकर परब यांनी केले, तर आभार प्रदर्शन आरोग्य सहाय्यक साईनाथ वेटे यांनी मानले.
या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी अरुण गवस, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी सुप्रिया रंगशूर, सीमा ठाकूर, रुपाली म्हाडगूत, नरेंद्र बांदवलकर, आशा स्वयंसेविका तसेच बांदा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



