सावंतवाडी : तालुक्यातील कुणकेरी शाळा नं. २ मधील दोन गुणी भावंडांनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करत सावंतवाडी तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. इयत्ता दुसरीतील कु. आर्यन बाबू झोरे आणि इयत्ता चौथीतील कु. आराध्या बाबू झोरे यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत यशाची चमकदार पताका फडकावली आहे.
पुणे येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत कु. आर्यन झोरे याने देशभरातील स्पर्धकांमध्ये ९ वा क्रमांक पटकावत विशेष राष्ट्रीय गुणवत्ता यादीतील पहिल्या १५ विद्यार्थ्यांमध्ये मानाचे स्थान मिळविले. तर त्याची बहीण कु. आराध्या झोरे हिने या स्पर्धेत २१ वा क्रमांक मिळवत कौतुकास्पद यश संपादन केले.
याचबरोबर कु. आराध्या झोरे हिने यशवंत स्पर्धा परीक्षेत १८० गुण मिळवत सावंतवाडी तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आणि गोल्ड मेडलवर नाव कोरले. सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत तिने १६८ गुणांसह आणखी एक गोल्ड मेडल पटकावले, तर ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत ७९ गुण मिळवत ब्राँझ मेडलही मिळविले.
कु. आर्यन झोरे यानेदेखील सिंधूरत्न टॅलेंट परीक्षेत १७३ गुणांसह गोल्ड मेडल मिळविले. ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत ८९ गुणांसह त्याने ब्राँझ मेडल पटकावत आपल्या बुद्धिमत्तेची छाप उमटविली. तसेच मंथन जनरल नॉलेज परीक्षेत १५० पैकी तब्बल १३० गुण मिळवत राज्यात अकरावा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहावा क्रमांक पटकावला.
इयत्ता तिसरीतील कु. सौम्या रामदास झोरे हिनेही ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत ५१ गुणांसह उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा गौरव वाढविला.
या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नागेश गावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सरपंच सोनिया सावंत, उपसरपंच सुनील परब, माजी सभापती प्रमोद सावंत, केंद्रप्रमुख भावना गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा ऋतुजा झोरे, उपाध्यक्ष बाबू झोरे तसेच भगवान सावंत, एकनाथ सावंत, नाना गावडे, कैलास परब, रघुनाथ गावडे, तानाजी सावंत, कृष्णा गावडे, महादेव गावडे आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



