कचऱ्याच्या विळख्यात मुक्या जीवांचा आक्रोश!, प्लास्टिक खाऊन मोकाट गुरांचे जीवन धोक्यात. ; ‘ह्या’ ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, दुर्गंधी, अस्वच्छता आणि रोगराईचा वाढता धोका.
- शशिकांत मोरे.
- रोहा : रोहा तालुक्यातील धाटाव ग्रामपंचायत हद्दीतील नाक्यावर उभारण्यात आलेली कचरा कुंडी सध्या मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. कचऱ्याने ओसंडून वाहणाऱ्या या कुंडीत अन्नाच्या शोधात मोकाट गुरे थेट उतरून प्लास्टिक, शिळे अन्न आणि घातक कचरा खात असल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि स्वच्छतेकडे झालेल्या दुर्लक्षामुळे मुख्य रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अनेक दिवस नियमित साफसफाई न झाल्याने कचरा कुंडी ओव्हरफ्लो झाली असून कचरा रस्त्यावर पसरला आहे. या कचऱ्यामध्ये प्लास्टिक पिशव्या, रिकाम्या दूध पॅकेट्स, शिळे अन्न, कागदी पुठ्ठे तसेच इतर घातक वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
भुकेने व्याकूळ झालेली गायी, बैल आणि इतर मोकाट जनावरे हा कचरा खाताना दिसत आहेत. विशेष म्हणजे काही गुरे थेट उंच कचरा कुंडीत उतरून कचरा खात असल्याचे धक्कादायक दृश्य नागरिकांना रोज पाहावे लागत आहे. प्लास्टिक पोटात गेल्यामुळे जनावरांना गंभीर आजार जडत असून अनेक वेळा त्यांचा मृत्यूही होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. 
नाक्यावरील दूध डेअरी, भाजी विक्रेते, हॉटेल, चायनिज सेंटर, चिकन दुकाने आदी ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात टाकण्यात येणारा ओला-सुका कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. घंटागाडी सेवा नियमित नसल्याने नागरिकही नाईलाजाने कचरा कुंडीतच कचरा टाकत आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही.
विशेष म्हणजे ही कचरा कुंडी नाक्यावर, सर्वांच्या नजरेसमोर असूनही संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही भीषण परिस्थिती दिसत नसल्याचे चित्र आहे. मुक्या जनावरांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवून तात्काळ कचरा कुंड्यांची नियमित स्वच्छता करावी, मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
- Advertisement -
error: Content is protected !!