✍️ शशिकांत मोरे.
रोहा : रोहा-नागोठणे-अलिबाग या महत्त्वाच्या मार्गावरील अष्टमी रेल्वे क्रॉसिंग येथे उभारण्यात येत असलेला रेल्वे उड्डाणपूल तब्बल तीन वर्षांपासून संथगतीने सुरू असून प्रवासी वर्गाचा संताप आता टोकाला पोहोचला आहे. “एका वर्षात पूर्ण होणारे काम तीन वर्षे का रखडले?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या रखडलेल्या कामामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका, व्यापारी तसेच दररोज प्रवास करणारे हजारो प्रवासी अक्षरशः त्रस्त झाले आहेत. खराब रस्ता, मोठमोठे खड्डे, धुळीचे लोट आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांचा प्रवास जीवघेणा बनला आहे. आता पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असताना या रस्त्याची अवस्था पाहता यंदा परिस्थिती आणखी भीषण होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अष्टमी रेल्वे क्रॉसिंगवर सतत रेल्वे वाहतूक सुरू असल्याने गेट वारंवार बंद केले जाते. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि प्रवाशांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून जानेवारी २०२३ मध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून तब्बल ६५ कोटी रुपयांच्या निधीतून रेल्वे उड्डाणपूल मंजूर करण्यात आला होता. रेल्वे आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के निधी देण्यात आला. उद्घाटनही मोठ्या थाटामाटात झाले आणि “हे काम एका वर्षात पूर्ण होईल” अशी घोषणा करण्यात आली होती.
मात्र प्रत्यक्षात तीन वर्षे उलटून गेली तरी पुलाचे काम पूर्ण होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. सुरुवातीला ‘मदिना इन्फ्रा’ या ठेकेदार कंपनीने काम हाती घेतले, मात्र काही दिवसांतच काम अर्धवट सोडून पलायन केले. त्यानंतर ‘मदानी इन्फ्रा’ने दोन वर्षे काम केल्यानंतर ती कंपनीही गायब झाली. आता ‘व्हीएसआर’ कंपनीकडे काम देण्यात आले असले तरी कामाचा वेग पाहता यंदाच्या पावसाळ्यातही हा पूल पूर्ण होण्याची शक्यता धूसर आहे.
दरम्यान, या खराब रस्त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक अपघात घडले असून काही निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तरीदेखील संबंधित प्रशासन आणि ठेकेदारांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
“ठेकेदार बदलतात, काम मात्र संपत नाही… नेमकं सुरू आहे तरी काय?” अशी चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये रंगू लागली आहे. निधी मंजूर झाला, उद्घाटन झाले, आश्वासने दिली गेली; पण प्रत्यक्षात नागरिकांना मिळाला तो फक्त त्रास, धूळ आणि खड्ड्यांचा प्रवास!
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाने आता तरी जागे होऊन पावसाळ्यापूर्वी रस्त्याची तातडीने डागडुजी करावी तसेच उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रवासी वर्गातून दिला जात आहे.



