नाशिक : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धावत्या एसटी बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. परिसरातील खोकड तलावासमोर असलेल्या निसर्ग लॉजिंगच्या अगदी समोर महामार्गावर हा थरार घडला.
ही आग ‘शहादा ते नाशिक’ या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला लागली. या बसचा क्रमांक MH 15 JW 0895 असा आहे. एसटी बसमधून एकूण 54 प्रवासी प्रवास करत होते. अचानक लागलेल्या या आगीमुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. बसला आग लागल्याचे चालकाच्या आणि वाहकाच्या तात्काळ लक्षात आले. त्यांनी कसलाही वेळ न घालवता बस महामार्गाच्या कडेला थांबवली आणि तातडीने सर्व 54 प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले.

सर्व प्रवासी खाली उतरत असतानाच आगीने रौद्ररूप धारण केले. काही क्षणांतच ही आग संपूर्ण बसमध्ये भडकली आणि डोळ्यादेखत अख्खी बस जळून खाक झाली. चालक, वाहक आणि प्रवाशांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी पूर्णपणे सुखरूप आहेत.
घटनेची माहिती मिळताच चांदवड येथील अग्निशामक दल आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत बसला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. महामार्गावर ऐन दुपारी ही घटना घडल्यामुळे मुंबई-आग्रा हायवेवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.



