आमचा परिसर उध्वस्त होऊ देणार नाही! – ग्रामस्थांचा एल्गार ! ; आरोंदा पंचक्रोशीत प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध.

सावंतवाडी : आरोंदा पंचक्रोशी परिसरात प्रस्तावित एका कंपनीच्या मायनिंग प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प राबवू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात समस्त ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा खणीकर्म अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून प्रस्तावित खाण प्रकल्प तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भटपावणी व आरोंदा पंचक्रोशीतील सर्व्हे क्रमांक १८/३ ते १८/४ या क्षेत्रामध्ये मायनिंग संदर्भातील ड्रोन सर्व्हे व अन्य कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, नोटीस उशिराने प्राप्त झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेली कंपनी ही एका समूहाशी संबंधित कंपनी असून, जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या खाणकामाच्या अनुभवामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेडी, तिरोडा, कळणे यांसारख्या भागांतील खाणकामामुळे पर्यावरण, शेती, जलस्रोत तसेच स्थानिकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

आरोंदा पंचक्रोशी हा शेती, मत्स्यव्यवसाय आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित परिसर असून प्रस्तावित मायनिंगमुळे येथील पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता आहे. जलस्रोतांचे नुकसान, शेतीचे होणारे संभाव्य नुकसान तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबतही ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.

“खाणकामामुळे नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होऊन भविष्यातील पिढ्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आरोंदा परिसरात कोणत्याही प्रकारच्या मायनिंग प्रकल्पास परवानगी देऊ नये,” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी निवेदनातून मांडली आहे.

दरम्यान, या प्रश्नावर आरोंदा पंचक्रोशीतील नागरिक एकवटले असून, स्थानिकांच्या भावना व हित लक्षात घेऊन प्रशासनाने प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाचा फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles