सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘विभागीय सुसंवाद २०२६’ कार्यक्रम आज चराठे येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) संदर्भातील अचूक व अधिकृत माहिती मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व देवी शारदेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी तंत्र शिक्षण विभागाचे परीक्षा समन्वयक कुणाल देवकर, कला शिक्षण विभागाचे सहाय्यक परीक्षा समन्वयक शार्दुल कदम, वैद्यकीय व आयुष विभागाचे परीक्षा समन्वयक सिद्धेश नर, उच्च शिक्षण विभागाचे परीक्षा समन्वयक नानासाहेब फटांगरे, तसेच तंत्र शिक्षण विभागाचे सहाय्यक परीक्षा समन्वयक पी. एम. झरकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
याशिवाय यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले आणि यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रास्ताविकात पी. एम. झरकर यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत अधिकृत, पारदर्शक आणि अद्ययावत माहिती थेट उपलब्ध करून देणे हेच या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
यानंतर कला शिक्षण विभागाचे शार्दुल कदम यांनी फाईन आर्ट्स व संबंधित अभ्यासक्रमांमधील प्रवेश प्रक्रिया, रोजगाराच्या संधी आणि करिअरच्या विविध वाटांबाबत मार्गदर्शन केले. वैद्यकीय व आयुष विभागाचे सिद्धेश नर यांनी एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबी विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितल्या.
तंत्र शिक्षण विभागाचे परीक्षा समन्वयक कुणाल देवकर यांनी एमएचटी-सीईटी अंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर विवेचन केले. CAP फेऱ्या, नोंदणी प्रक्रिया, कागदपत्र पडताळणी, महाविद्यालय निवड, प्राधान्यक्रम भरणे आणि प्रवेश मिळविताना घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी आणि पालकांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देत शंकानिरसनही करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी अशा प्रकारचे संवादात्मक मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची भावना उपस्थित विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक बॉनी शेरॉव्ह यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे प्राध्यापक, कर्मचारी व स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.
“योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन आणि योग्य निर्णय यशस्वी करिअरचा पाया ठरतो,” या संकल्पनेला साजेसा ठरलेला हा विभागीय सुसंवाद कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि भविष्यवेधी ठरला.


