– संदीप चव्हाण.
वेंगुर्ला : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीचा विचार करत शिवसेनेच्या वतीने म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघात मोफत छत्री वाटपाचा भव्य उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, १३ जून रोजी सकाळी १० वाजता शरयू मंगल कार्यालय, पाट हायस्कूलसमोर हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे.
शिवसेना विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांच्या सहकार्याने दरवर्षी राबविण्यात येणारा हा लोकहिताचा उपक्रम यंदाही मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला असून परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात आवश्यक असलेली छत्री मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे या उपक्रमाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या यज्ञा साळगांवकर, वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई तसेच शिवसेनेचे विविध पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.
म्हापण विभाग प्रमुख देवदत्त साळगांवकर यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत छत्री वाटपाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिकांच्या सेवेसाठी पुढाकार घेतल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.


