…अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागणार! : राजू मसुरकर. ; भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून सावंतवाडी पालिकेला कायदेशीर इशारा, नसबंदी मोहीम राबविण्याची मागणी.

सावंतवाडी : शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने नसबंदी मोहीम राबविण्यात यावी, अन्यथा कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात येईल, असा इशारा जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेला दिला आहे.

श्री. मसुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडत असून नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी रुग्णालयांची धाव घ्यावी लागत आहे.

यासंदर्भात गुरुवारी (दि. १८) त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने नसबंदी मोहीम सुरू करण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी नसबंदी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत निर्देश दिले असल्याचा दावा करत, त्याची अंमलबजावणी स्थानिक स्तरावर होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नगरपालिकेने पुढील आठ दिवसांत आवश्यक कार्यवाही न केल्यास जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतर संबंधित प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार असल्याचे मसुरकर यांनी स्पष्ट केले.

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना भीतीच्या वातावरणातून जावे लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नसबंदी कार्यक्रम प्रभावीपणे राबविल्यास भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles