सावंतवाडी : देशभक्तीचा जोश, हातात तिरंगा आणि ओठांवर भारतमातेचा जयघोष… अशा उत्साहपूर्ण वातावरणात सावंतवाडीत उद्या ‘हर घर तिरंगा’ रॅलीचा भव्य-दिव्य सोहळा रंगणार आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारी ही रॅली ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास भाजपाचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला आहे.

देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान आणि तिरंग्याप्रती असलेली निष्ठा जनमानसात अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीची तयारी गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू आहे. विशाल परब यांच्या पुढाकाराने सावंतवाडी शहरासह विविध ठिकाणी आकर्षक बॅनर, फलक आणि तिरंग्याच्या सजावटीने वातावरण देशभक्तिमय झाले असून नागरिकांचे लक्ष या भव्य रॅलीकडे वेधले गेले आहे.
सर्वपक्षीय सहभागाचे ठरणार आकर्षण!
या रॅलीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. राजकीय मतभेद बाजूला ठेवून ‘देश प्रथम’ या भावनेने एकत्र येण्याचा हा उपक्रम असल्याने रॅलीला व्यापक स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे.
सावंतवाडी शहराच्या विविध भागांतून तिरंगा घेऊन नागरिक सहभागी होणार असून, भारत माता की जय, वंदे मातरम् आणि जय हिंदच्या घोषणांनी सावंतवाडी दुमदुमून जाणार, अशी उत्सुकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
विशाल परब यांच्या पुढाकाराची जोरदार चर्चा
रॅलीच्या नियोजनापासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत युवा नेते विशाल परब यांनी घेतलेला पुढाकार सध्या सावंतवाडीच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. रॅली अधिकाधिक भव्य आणि शिस्तबद्ध व्हावी, यासाठी कार्यकर्त्यांची विविध पथके कामाला लागली असून नागरिकांमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
“ही केवळ रॅली नसून प्रत्येक भारतीयाच्या मनातील देशभक्ती व्यक्त करणारा उत्सव आहे. सावंतवाडीच्या भूमीतून तिरंग्याचा सन्मान आणि राष्ट्रभक्तीचा भव्य संदेश संपूर्ण महाराष्ट्राला देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे,” असे आवाहन युवा नेते विशाल परब यांनी केले आहे.
सावंतवाडी सज्ज; तिरंग्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला!
रॅलीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात निर्माण झालेल्या देशभक्तीच्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी झळकणारे बॅनर, तिरंगा ध्वज आणि रॅलीच्या तयारीमुळे ‘उद्या सावंतवाडीचा दिवस तिरंग्याच्या नावावर!’ अशीच भावना सर्वत्र पाहायला मिळत आहे.
हजारो नागरिक या रॅलीत सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून सावंतवाडीच्या इतिहासातील एक अविस्मरणीय आणि दिमाखदार देशभक्तीचा सोहळा म्हणून या रॅलीची नोंद होण्याची शक्यता आहे.



