सामाजिक कार्याची ‘हिरकणी’ ठरल्या मानसी परब राणे!, ‘कोकण हिरकणी कर्तृत्व पुरस्कार’ने सन्मान! ; सामाजिक, सांस्कृतिक व महिला सक्षमीकरण योगदानाची दखल.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, महिला सक्षमीकरण तसेच महिला रोजगारनिर्मितीच्या क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. मानसी परब राणे यांच्या सामाजिक व जनहिताच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘कोकण हिरकणी कर्तृत्व पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

क्रांती दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, कोकण बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि यशश्री फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोकण कला व साहित्य गौरव संमेलन २०२६’ मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सिंधुदुर्गनगरी येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनात झालेल्या या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सौ. मानसी परब राणे यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, ज्येष्ठ संगीतकार व गझलकार अतुल दिवे, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय चव्हाण, सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री श्रुती पारकर, पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तुषार शिवशरण, ज्येष्ठ कलावंत दादा राणे-कोनस्कर, ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर तसेच प्रा. डॉ. बी. एन. खरात यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

विविध क्षेत्रांत ठसा उमटविणारे कार्य

सौ. मानसी परब राणे यांनी आजवर विविध सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत समाजसेवेची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. महिला सक्षमीकरण, महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे यांसह विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.

तसेच अन्यायाला सामोरे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठीही त्यांनी सातत्याने आवाज उठवत योगदान दिले आहे. सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घटकांसाठी केलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याला मिळालेली विशेष पावती मानली जात आहे.

‘कोकण हिरकणी कर्तृत्व पुरस्कार’ मिळाल्याबद्दल सौ. मानसी परब राणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles