सावंतवाडी : “हा केवळ आजगावचा लढा नाही, तर संपूर्ण सिंधुदुर्गच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे!” अशा शब्दांत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी खनिज ड्रोन सर्वेक्षणाविरोधातील संघर्षाची रणशिंगे फुंकली. आजगावसह दशक्रोशीतील १८ गावांमध्ये प्रस्तावित खनिज सर्वेक्षणाविरोधात आज आजगाव वेतोबा मंदिरात झालेल्या जाहीर बैठकीत येत्या मंगळवारी आजगाव वेतोबा मंदिर ते आरवली वेतोबा मंदिर दरम्यान भव्य जनआक्रोश रॅली काढण्याचा निर्धार करण्यात आला.
या रॅलीत सर्वपक्षीय कार्यकर्ते, निसर्गप्रेमी, शेतकरी, बागायतदार आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करताना संजू परब म्हणाले, “वेतोबाच्या साक्षीने आपण राजकारण बाजूला ठेवून निसर्गरक्षणासाठी एकत्र आलो आहोत. देवभूमीच्या मातीवर घाला घालणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला जनता कधीच माफ करणार नाही.”
ग्रामस्थांच्या आग्रहानुसार माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांनाही या आंदोलनात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही संपर्क सुरू असल्याची माहिती देत, या आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप देण्याचे संकेत त्यांनी दिले.
⚠️ “आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तर कोकणी बाणा दाखवू!”
संजू परब यांनी प्रशासनाला इशारा देताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही शांततेच्या मार्गाने विरोध करत आहोत. मात्र जनतेचा आवाज दाबण्याचा किंवा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला, तर वेळप्रसंगी कोकणी बाणा काय असतो हे दाखवून देऊ.”
ते पुढे म्हणाले, “फक्त १० गावांचा प्रश्न म्हणून हा विषय पाहू नका. हा संपूर्ण सिंधुदुर्गच्या पर्यावरणाचा आणि भावी पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. येत्या चार दिवसांत घराघरात हा संदेश पोहोचवा आणि मंगळवारी हजारोंच्या संख्येने रॅलीत सहभागी व्हा.”
🌿 “निसर्गाच्या ओरबाडणीविरोधात मनसेही मैदानात”
मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनीही ग्रामस्थांना पाठिंबा जाहीर करताना सांगितले की, “निसर्गाची लूट थांबवण्यासाठी मनसे ग्रामस्थांसोबत खंबीरपणे उभी आहे. मंगळवारी होणाऱ्या मोर्चाला राज ठाकरे यांनी मार्गदर्शन करावे, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.”
💧 “खनिज प्रकल्प म्हणजे जलस्रोतांवर घाला”
ॲड. स्वप्नील प्रभूआजगावर यांनी हा लढा प्रत्येक गावाचा असल्याचे सांगत सर्वांनी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन केले. तर आजगावच्या सरपंच यशश्री सौदागर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आमचा परिसर आंबा, काजू आणि फळबागांनी समृद्ध आहे. खाण प्रकल्प आल्यास जलस्रोत नष्ट होतील, शेती उद्ध्वस्त होईल आणि पर्यावरणाचा अपरिमित ऱ्हास होईल. त्यामुळे हा प्रकल्प आम्हाला कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही.”
या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, संघर्ष समिती अध्यक्ष अजित नातू, ॲड. स्वप्नील प्रभूआजगावर, आजगाव सरपंच यशश्री सौदागर, रूपेश धर्णे, सचिन प्रभू, अमित प्रभू, सागर नाणोसकर, सिद्धेश परब, सुरज परब, देव्या सुर्याजी, मिलिंद सावंत, जितेंद्र मोरजकर, आबा चिपकर, नील प्रभू झांटये, रामचंद्र ऊर्फ अण्णा झाटये, श्रीनाथ केदार, रवींद्र धर्णे, सतीश आकेरकर, राजेश आजगावकर, सौरभ वराडकर, शुभम जोशी, जय केदार, हरेश वरडाकर, गोविंद वैज, संदेश वैज, सावळाराम केदार, आबा केदार, अभी केदार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



