मी पालकमंत्री असेपर्यंत मायनिंग होऊ देणार नाही! – वेतोबाच्या साक्षीने पालकमंत्री नितेश राणे यांची गर्जना.

श्रीफळ अर्पण करून वेतोबा चरणी घेतली शपथ; ग्रामस्थांच्या लढ्याला पालकमंत्र्यांचा ठाम पाठिंबा!

सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव पंचक्रोशीत प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाविरोधातील संघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचला असतानाच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज ग्रामदैवत श्री देव वेतोबा यांच्या साक्षीने मोठी घोषणा करत ग्रामस्थांना दिलासा दिला. वेतोबा मंदिरात श्रीफळ अर्पण करून त्यांनी “मी पालकमंत्री असेपर्यंत आजगाव पंचक्रोशीत मायनिंगसारखा विनाशकारी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही,” अशी जाहीर ग्वाही दिली.

मॅग्नेटिक ड्रोन सर्व्हेनंतर आजगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, गावाच्या अस्तित्वाशी निगडित असलेल्या या प्रश्नावर जनआंदोलन उभे राहत आहे. येत्या २३ जून रोजी भव्य विरोधी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी थेट आजगाव गाठत ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली.

वेतोबा मंदिर परिसरात झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करत मायनिंग प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला. यावेळी नितेश राणे यांनी ग्रामस्थांच्या भावना समजून घेत “जनतेच्या इच्छेविरुद्ध कोणताही प्रकल्प रेटून आणला जाणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.

विशेष म्हणजे, वेतोबा चरणी नतमस्तक होत ग्रामस्थांनीही “गावाच्या भूमीवर विनाशकारी मायनिंग प्रकल्प येऊ देणार नाही,” असा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे वेतोबा मंदिर परिसरात एकप्रकारे ग्रामएकतेची आणि संघर्षाची शपथच घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, ॲड. स्वप्नील प्रभू-आजगांवकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, उपसरपंच सुशील कामटेकर, कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष अजित नातू, पंचक्रोशीतील सरपंच, पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

“वेतोबाच्या साक्षीने शब्द दिला; आता मायनिंगविरोधातील लढ्याला नवी धार!” 

ग्रामस्थांच्या भावना, वाढता जनक्षोभ आणि पालकमंत्र्यांची स्पष्ट भूमिका यामुळे आजगाव पंचक्रोशीतील मायनिंगविरोधी आंदोलनाला आता अधिक बळ मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles