अवैध दारू तस्करीवर पोलिसांचा घणाघात! ; दोन स्वतंत्र कारवायांत वाहनांसह तब्बल १० लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे जाळ्यात!

सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात बेकायदेशीर दारू वाहतुकीविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम राबवत दोन स्वतंत्र कारवायांमध्ये वाहनांसह जवळपास १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या कारवाईत मेल्व्हिन फर्नांडिस (वय २६, देवसा-उत्तर गोवा) व मनवेल फिलिप्स फर्नांडिस (वय ६६, ख्रिश्चनवाडी-सातार्डा) हे दोघे GA-05-D-5576 क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधून गोवा बनावटीची विविध ब्रँडची दारू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. भोसले, हवालदार कांडर व त्यांच्या पथकाने तळवळे गडगेवाडी-तळी स्टॉप येथे सापळा रचला. वाहनाची तपासणी केली असता २८ बॉक्समधील १ लाख ७१ हजार २४० रुपयांची दारू आणि ५ लाख रुपयांची स्विफ्ट कार असा एकूण ६ लाख ७१ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत गोपीनाथ दगडू शितोळे (वय ४०, गणेशवाडी, ता. दौंड, जि. पुणे) हा MH-42-K-0269 क्रमांकाच्या टाटा सुमोमधून म्हापसा-गोवा येथून पुण्याकडे बेकायदेशीर दारू घेऊन जात असताना आंबोली फॉरेस्ट नाका येथे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आंबोली दूरक्षेत्राच्या पथकाने वाहन तपासणी केली असता त्यामध्ये १२ बॉक्समधील ४८ हजार ९६० रुपयांची गोवा बनावटीची दारू आढळून आली. यासह ३ लाख रुपयांचे वाहन असा एकूण ३ लाख ४८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली दूरक्षेत्राचे पोलिस हवालदार मनीष शिंदे, लक्ष्मण काळे, रामदास जाधव, गौरव परब आणि सचिन चव्हाण यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

सीमावर्ती भागातून सुरू असलेल्या दारू तस्करीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी उघडलेल्या या मोहिमेमुळे तस्करांचे धाबे दणाणले असून, बेकायदेशीर वाहतुकीविरोधात आणखी कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles