हळदोणा ( गोवा) : हळदोणा येथील श्री साखळेश्वर भगवती देवस्थान, किटला येथे 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. श्री दत्त पद्मनाभ पीठ तपोभूमी संचालित संत समाज हळदोणा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष योगसत्राला संत समाजाचे सदस्य, गुरुबंधू-भगिनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साखळेश्वर भगवती देवस्थानचे अध्यक्ष अमर मांद्रेकर उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी योगाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत योग ही काळाची गरज बनली आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करणे आवश्यक आहे. श्री दत्त पद्मनाभ पीठाचे समाजोपयोगी कार्य अत्यंत स्तुत्य असून अशा विधायक उपक्रमांना आमचे सहकार्य सदैव राहील.” तसेच देवस्थान परिसरात योग दिनाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन करून आभारही व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात परमपूजनीय पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संत समाज हळदोणा अध्यक्ष सविदास नाईक, लीडर वर्षा नर्वेकर तसेच योगशिक्षक अनिल नार्वेकर उपस्थित होते. योगशिक्षक अनिल नार्वेकर यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम तसेच योगाच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे योगाचे महत्त्व समजावून सांगत नियमित योगाभ्यासाचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कुमारी देविका हिने केले, तर सविदास नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वी ठरला असून, समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाने हळदोणा परिसरात आरोग्य, अध्यात्म आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला.



