वयाच्या ७० व्या वर्षीही मातीतला जिव्हाळा कायम! ; नेमळेच्या गोविंद राऊळ यांचा ‘प्रगतशील शेतकरी’ म्हणून कृषी दिनी उपसभापती गौरव मुळीक यांच्या हस्ते सन्मान!

भात व आंबा पिकातील उल्लेखनीय कामगिरीची दखल. 

सावंतवाडी : वय ही केवळ संख्या असते आणि जिद्द, मेहनत व मातीवरील प्रेम असेल तर यश नक्कीच मिळते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे नेमळे गावातील ज्येष्ठ शेतकरी गोविंद आपा राऊळ. वयाच्या ७० व्या वर्षीही शेतीत तितक्याच जोमाने राबत आधुनिक आणि पारंपरिक शेतीचा सुंदर समन्वय साधणाऱ्या गोविंद राऊळ यांना कृषी दिनानिमित्त ‘प्रगतशील शेतकरी’ म्हणून सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पंचायत समिती सावंतवाडी आणि ग्रामपंचायत बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी दिन कार्यक्रमात भात व आंबा पिकामधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना प्रगतशील शेतकरी प्रमाणपत्र देऊन पंचायत समिती, सावंतवाडीचे उपसभापती गौरव मुळीक यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.

गोविंद आपा राऊळ यांनी अनेक वर्षांच्या अथक परिश्रमातून शेतीत यश मिळवत परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. आजही ते उत्साहाने शेतीत राबत असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ नव्या पिढीतील शेतकऱ्यांनी घ्यावा, अशी भावना कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली.

प्रगतशील शेतकरी म्हणून मिळालेला हा सन्मान केवळ गोविंद आपा राऊळ यांचाच नसून, कष्ट, चिकाटी आणि शेतीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा गौरव असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या सन्मानाबद्दल गोविंद आपा राऊळ यांचे ग्रामपंचायत नेमळे, महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसेच परिसरातील शेतकरी बांधवांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles