Big News – दोडामार्गचे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत अन् मालवणचे विस्तार अधिकारी संजय माने यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर!

सिंधुदुर्गनगरी, : आपत्‍ती व्‍यवस्‍थापन व निवडणूक कामकाज हे दोन्‍ही विषय संवेदनशील व अतितात्‍काळ स्‍वरुपाचे आहेत. असे असताना दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्‍य सावंत आणि मालवणचे विस्‍तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी गट शिक्षणाधिकारी संजय माने यांना त्‍यांचे शासकीय कामकाजातील हलगर्जीपणाबाबत आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा २००५ कलम ५६ अन्‍वये कर्तव्‍यात कसूर केल्‍याचे दिसून आले. तसेच लोकप्रतिनीधीत्‍व अधिनियम १९५० चे कलम ३२ नुसार निवडणूक कामकाजात देखील कसूर केल्‍याचे स्‍पष्‍टपणे निदर्शनास आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे अजिंक्‍य सावंत, गटविकास अधिकारी, दोडामार्ग यांची निलंबनाची शिफारस शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या प्रधान सचिवांना तर मालवणचे विस्‍तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी गट शिक्षणाधिकारी संजय माने यांची शिफारस सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दोडामार्ग तालुक्यातील अतिवृष्टी व त्याअनुषंगाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोमवार दि ६ जुलै २०२६ रोजी दौरा केला होता. सदर दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मौजे वझरे, ता. दोडामार्ग येथे झाडे पडून नुकसान झालेल्या सुमारे ३० घरांची पाहणी केली. त्यावेळी दोडामार्ग गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत हे अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आलेले आहे तसेच दि. २० एप्रिल २०२६ रोजी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत करावयाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आलेली होती. सदर बैठकीमध्ये झाडे तोडणेबाबत संबंधित ग्रामपंचायतींना सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या व त्याबाबत संबंधित गटविकास अधिकारी यांनी पाठपुरावा करुन कार्यवाही पूर्ण करुन घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. असे असताना देखील गटविकास अधिकारी, दोडामार्ग यांनी सदरबाबत आवश्यक ती कार्यवाही केलेली नाही. तसेच दोडामार्ग तालुक्‍यातील विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) कार्यक्रमाचा आढावा जिल्‍हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तहलिसदार कार्यालय, दोडामार्ग येथे घेतला. सदर आढावा बैठकीस अनुपस्थित राहिलेले आहेत. शिवाय या अनुपस्थितीकरीता त्‍यांनी जिल्‍हाधिकारी सिंधुदुर्ग यांची कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नसल्याने त्यांच्या निलंबनाची शिफारस शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या प्रधान सचिवांना करण्यात आलेली आहे.
निवडणूक कामकाजाच्‍या अनुषंगाने मालवण दौ-याच्‍या वेळी तालुक्‍यातील विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) कार्यक्रमाचा आढावा जिल्‍हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी तहलिसदार कार्यालय, मालवण येथे घेतला. सदर आढावा बैठकीस तालुक्‍यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी व मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO) तसेच पर्यवेक्षक यांना प्रत्‍यक्ष उपस्थित राहणेबाबत दुरध्‍वनीद्वारे आगाऊ सूचित करण्‍यात आलेले होते. पंचायत समिती, मालवणचे विस्‍तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी गट शिक्षणाधिकारी संजय माने, यांना सहा. मतदार नोंदणी अधिकारी म्‍हणून नियुक्‍त करण्‍यात आलेले आहे. असे असताना देखील ते सदर बैठकीस अनुपस्थित राहिलेले आहेत. तसेच सदर अनुपस्थितीकरीता त्‍यांनी जिल्‍हाधिकारी सिंधुदुर्ग यांची कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नसल्याने त्यांच्या शासकीय कामकाजातील हलगर्जीपणाबाबत शासकीय सेवेतून निलंबित करणेबाबत शिफारस जिल्हा प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles