चार दिवस अंधारात पाडलोस! देवाच्या दिव्याच्या उजेडात विद्यार्थ्यांचा अभ्यास; “डिजिटल शिक्षणाच्या घोषणा आणि वास्तवात काळोख!” रॉकेल बंद… वीज गायब… मग अभ्यास करायचा तरी कसा? संतप्त विद्यार्थी-पालकांचा सरकारला थेट सवाल.

बांदा : पाडलोस गाव गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण अंधाराच्या विळख्यात सापडले असून, या अंधाराचा सर्वात मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. घरात वीज नसल्याने देवासमोर लावल्या जाणाऱ्या छोट्याशा तेलाच्या दिव्याच्या उजेडात अभ्यास करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. एका बाजूला सरकारकडून डिजिटल शिक्षण, स्मार्ट शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या घोषणा केल्या जात असताना, दुसरीकडे विद्यार्थ्यांना दिव्याच्या लुकलुकत्या प्रकाशात पुस्तके उघडावी लागत असल्याने प्रशासनाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी सायंकाळी घरी पोहोचतात आणि काही वेळातच अंधार पडतो. मात्र गावात वीजच नसल्याने गृहपाठ, अभ्यास किंवा परीक्षेची तयारी करणे अशक्य झाले आहे. सरकारने काही वर्षांपूर्वी रॉकेलचा पुरवठा बंद केला आणि आता चार-चार दिवस वीजही मिळत नसल्याने, “आम्ही अभ्यास करायचा तरी कसा?” असा संतप्त सवाल विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

परीक्षेच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. लहान मुलांचा गृहपाठ रखडला आहे, तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोबाईल चार्ज करता येत नसल्याने ऑनलाइन शिक्षण, अभ्यास साहित्य आणि शिक्षकांशी संपर्कही पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अक्षरशः अंधारात ढकलले जात असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवा!

शिक्षणासारख्या संवेदनशील विषयाकडे दुर्लक्ष करणे प्रशासनाला परवडणारे नाही. पाडलोससह परिसरातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा “विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर पसरलेला हा अंधार दूर करण्यासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles