सावंतवाडी : शहरातील न्यू सबनिसवाडा येथील टीचर कॉलनी सोसायटीच्या बांधकामास संबंधित बिल्डरला देण्यात आलेली परवानगी ही प्रशासकीय काळात मंजूर करण्यात आली होती. या प्रकरणात बिल्डरने रहिवाशांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला असून, “ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (ओसी) नेमके कोणत्या निकषांवर मंजूर करण्यात आले?” असा सवालही उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी दिला.
टीचर कॉलनीतील पाणीटंचाईच्या समस्येची पाहणी करण्यासाठी नगराध्यक्षा भोंसले यांनी आज सायंकाळी रहिवाशांची भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी नागरिकांना धीर देत प्रशासकीय काळात झालेल्या कामकाजाची सखोल चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले.
रहिवाशांनी यावेळी गंभीर आरोप करत सांगितले की, बिल्डरने नगरपरिषदेचे पाणी कनेक्शन टाकीत सोडून तीच विहीर असल्याचे भासवून नागरिकांची दिशाभूल केली. त्यामुळे आज पिण्याच्या पाण्याचा तीव्र प्रश्न निर्माण झाला असून अनेक कुटुंबांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
दरम्यान, पाणीअभावी लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असून ज्येष्ठ नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या माध्यमातून उद्याच पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करण्यात येईल, अशी ग्वाही पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी दिली.
यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्यासह सभापती सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, प्रतीक बांदेकर, सुनिता पेडणेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले तसेच न्यू सबनिसवाडा येथील टीचर कॉलनी सोसायटीचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



