सिंधुदुर्गात १५० कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक, तळवणेत उभारणार अत्याधुनिक इलेक्ट्रिक बोट निर्मिती प्रकल्प! ; मुंबई वॉटर मेट्रोसाठी सिंधुदुर्गात तयार होणार जलयाने, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार.

मुंबई / सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या सागरी विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथे सुमारे १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत अत्याधुनिक इलेक्ट्रिक बोट निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मे. झोया मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यात मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

या करारानुसार मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेली आधुनिक, पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक जलयाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथे सुमारे २२ एकर जागेवर इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा अत्याधुनिक कारखाना उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे हरित सागरी वाहतुकीला चालना मिळण्यासोबतच महाराष्ट्रातील जहाजबांधणी उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे.

यावेळी या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पामुळे सिंधुदुर्गमध्ये औद्योगिक विकासाला गती मिळण्याबरोबरच स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जात असून, मुंबई वॉटर मेट्रोसाठी जलयाने तयार करण्यासोबतच सिंधुदुर्गमध्ये इलेक्ट्रिक बोट उद्योग उभारण्याचा हा निर्णय राज्याच्या सागरी अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या बैठकीस परिवहन व बंदरे विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, मे. झोया मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. चे संचालक जॉन फर्नांडिस, संचालक सुरज देवाढीया तसेच डॉ. निलेश बानवलीकर उपस्थित होते.

या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग औद्योगिक आणि सागरी क्षेत्रात नवे स्थान निर्माण करेल, तसेच हरित तंत्रज्ञानावर आधारित जहाजबांधणी उद्योगाला राज्यात नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles