सावंतवाडी : हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक परमपूज्य श्री सद्गुरु मियासाब यांचा 81 वा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने संपन्न झाला. मियांसाहेब यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आज कोकणासह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि अन्य राज्यांतील हजारो भाविकांनी दर्ग्यावर हजेरी लावली. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन तसेच विविध धर्मांचे श्रद्धाळू मोठ्या भक्तिभावाने समाधीस्थळी नतमस्तक झाले. अनेकांनी आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नवस फेडले, तर मानाची चादर अर्पण करून सद्गुरूंचे आशीर्वाद घेतले.


सद्गुरु मियासाब यांचा ८१ वा पुण्यतिथीनिमित्त सकाळपासून सद्गुरू पूजन, नामस्मरण, किर्तन, ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत वाचन हरिपाठ, आरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी हजारो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, भक्तांनी उपस्थित राहत दर्शन घेतले. यावेळी प. पू. सद्गुरू मि्यांसाब भक्त मंडळाचे अध्यक्ष वसंत राणे, उपाध्यक्ष सतीश शिरोडकर, सरचिटणीस दत्तप्रसाद अरविंददेकर, खजिनदार शैलेश पै, सहचिटणीस उमेश कोरगावकर, सदस्य सुभाष स्वार, ऋतुराज शिर्के, सदानंद पडते, साईप्रसाद हवालदार, वैभव उर्फ बंटी माठेकर, सुनील सावंत, मनोहर मसुरकर, रघुनाथ कोरगावकर, चंद्रशेखर गिरप यांसह शेकडो परमपूज्य सद्गुरु मियांसाब भक्त मंडळी उपस्थित होते.

दिवसभर दर्गा परिसरात भक्ती, श्रद्धा आणि सामंजस्याचे वातावरण अनुभवायला मिळाले. विविध धर्मीय बांधव एकाच श्रद्धेने सद्गुरूंच्या चरणी माथा टेकवत असल्याचे भावपूर्ण चित्र येथे पाहायला मिळाले. धर्म वेगळे असले तरी श्रद्धा, प्रेम आणि मानवतेचा संदेश एकच असतो, याची प्रचिती मियांसाहेब दर्ग्यावर प्रत्येक वर्षी येणाऱ्या या सोहळ्यातून पुन्हा एकदा संपूर्ण समाजाला मिळाली.
मियांसाहेब दर्गा आजही सर्वधर्मसमभाव, बंधुभाव आणि मानवतेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे श्रद्धेचे पवित्र स्थान म्हणून ओळखला जात आहे.



