माझी कविता मालवणी मातीतच रुजलेली! : कवी रुजारिओ पिंटो. ; ‘मालवणी भाषेचो कंठो, रुजारिओ पिंटो!’

मालवण:  माझी मालवणी कविता मालवणी मातीतच रुजून आली. म्हणूनच तिच्यात मालवणी माणसांची सुखदुःखे, त्यांचा इरसालपणा दिसून येतो. दारिद्र्यातही विचारांची श्रीमंती देणारी माझी आई माझ्या प्रत्येक कवितेची मूलस्त्रोत आहे.
‘घर सगळा गळता
चाय चुलीवरच जळता
सारे सुखात जेवतत
आमची भांडी पेवतत!’
हे चरण म्हणजे माझ्या बालपणाचा बोलपट होय, असे उद्गार कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण आणि सानेगुरुजी कथामाला शाखा, मालवण यांच्या संयुक्तपणे घेण्यात आलेल्या मालवणी मुलाखतीत मालवणी ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो यांनी काढले. सदर मुलाखत सुरेश ठाकूर, अध्यक्ष कोमसाप मालवण यांनी घेतली.

आचरे येथील मातोश्री मंगल कार्यालयाच्या सभागृहात ‘मालवणी भाषेचो कंठो! रुजारिओ पिंटो!’ या सदराखाली त्यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. ठाकूर यांच्या इरसाल मालवणी प्रश्नांना कवी रुजारिओ पिंटो यांनी तेवढ्याच खुमासदार मालवणीने उत्तर देऊन मुलाखतीत रंगत आणली.
प्रारंभी मालवणी कवयित्री सुनंदा कांबळे, विजयदुर्ग यांनी पिंटो यांचे स्वागत करून त्यांची मालवणीतून आगळीवेगळी ओळख करून दिली.
*मी कसा घडलो* हे सांगत असताना ते काही काळ आईच्या आठवणीने भावनाविवश झाले.
आपणास जरी महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही तरी आता माझ्या मालवणी कविता मुंबई विद्यापीठाच्या बोलीभाषेत निवडल्या गेल्या आहेत. माझ्या कवितांना ज्यावेळी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर अशा प्रभूतींकडून गौरविले जाते त्यावेळी झालेले आंतरिक समाधान मला शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यानंतर त्यांनी *माऊली* ( मराठी), *दर्यादेगर* (कोकणी ), *आम्ही मालवणी* ( मालवणी ), *गरो फणसाचो* ( मालवणी ) आदी काव्यसंग्रहातील काही कवितांची उगमस्थाने सांगितली. त्यांनी सादर केलेल्या *शालग्या* आणि *कायच कळना नाय* या मालवणी कवितांनी रसिकांना मनमुराद हसविले. कोकण मराठी साहित्य परिषदेपासून राष्ट्रीय साहित्य अकादमी, कोकणी सभा आदी विविध बारा समित्यांवर काम करीत असताना आलेले अनुभव आपल्या मुलाखतीत त्यांनी कथन केले. कोकणीनंतर हिंदी भाषेत त्यांचा *मेरी माँ* हा कवितासंग्रह लवकरच येत आहे. चार भाषांत कविता करणारा महाराष्ट्रातील एकमेव कवी म्हणून ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कोमसापची ही पहिलीच मालवणी मुलाखत चिरस्मरणीय ठरली. यावेळी कोमसाप शाखा मालवण आणि साने गुरुजी कथामाला शाखा मालवणच्या आजीव सदस्यांसहित इतर बहुसंख्य रसिक उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles