वेंगुर्ला : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण वातावरण विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेले असताना, भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते तथा यशस्वी युवा उद्योजक विशाल परब हेही भक्तिरसात पूर्णपणे रंगून गेल्याचे भावस्पर्शी चित्र पाहायला मिळाले. “अवघा रंग एक झाला…” या संतवचनाची जणू प्रत्यक्ष अनुभूती देत विशाल परब यांनी विठ्ठल नामाचा अखंड जप करत भक्तांसोबत तन-मनाने एकरूप होत पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन भावपूर्ण प्रार्थना केली.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीनही तालुक्यांतील विविध विठ्ठल मंदिरांमध्ये आयोजित धार्मिक कार्यक्रमांना विशाल परब यांनी आवर्जून उपस्थिती लावली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भक्तांसोबत विठूनामाचा गजर करत भक्तिभावाने पूजा-अर्चा केली. पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होत संपूर्ण कोकणवासीयांच्या सुख, शांती, समृद्धी आणि निरामय जीवनासाठी त्यांनी मनोभावे प्रार्थना केली.

वेंगुर्ला येथील कार्यक्रमावेळी विशाल परब यांच्या उपस्थितीने धार्मिक सोहळ्याला विशेष उत्साह लाभला. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात ते इतके तल्लीन झाले की, उपस्थित भाविकांनाही त्यांच्या अढळ श्रद्धेची आणि भक्तीची प्रचिती आली. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला भक्तिभाव, विठ्ठलावरील निस्सीम श्रद्धा आणि वारकरी परंपरेप्रती असलेली आत्मीयता यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
या प्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई, नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवडळकर, नगरसेवक सचिन शेट्ये, रवी शिरसाट, भाजप जिल्हा उपाध्यक्ष साईप्रसाद नाईक, मच्छीमार नेते दादा केळुसकर, किरण कुबल, विजय रेडकर तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने वारकरी व भाविक उपस्थित होते.
आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी युवा नेते विशाल परब यांनी राजकारणापलीकडे जाऊन अध्यात्म, संस्कृती आणि वारकरी परंपरेप्रती असलेली आपली निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित केली. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात तल्लीन झालेल्या त्यांच्या भक्तिमय रूपाची चर्चा भाविकांमध्ये दिवसभर रंगली आणि “याची देही, याची डोळा” भक्तीचा हा अद्वितीय सोहळा अनुभवण्याचे भाग्य अनेकांना लाभले.



