सावंतवाडी : स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” हा विचार आजही शिवसैनिकांच्या कार्याचा मार्गदर्शक आहे. संघर्षाच्या काळातही पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी निष्ठेने उभे राहिलेले शिवसैनिक समाजहिताची परंपरा अखंडपणे पुढे नेत आहेत. संघर्ष हा कायमस्वरूपी नसतो; मात्र समाजासाठी सातत्याने काम करणाऱ्यांनाच यश मिळते. केवळ राजकारण न करता सामाजिक बांधिलकी जपत समाजकारण केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन वेत्येचे युवा व आदर्श सरपंच गुणाजी गावडे यांनी केले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध सामाजिक उपक्रमांच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी वेत्ये येथील श्री देव कळेश्वर मंदिरात नारळ व पेढे अर्पण करून मालवणी परंपरेनुसार गाऱ्हाणे घालण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्यासाठी शिवसैनिकांनी सामूहिक प्रार्थना केली. या प्रसंगी सरपंच गुणाजी गावडे, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील गावडे, चराठेचे बाळू परब, संतोष गावडे, गुरुदास गावकर तसेच देवस्थानचे मानकरी उपस्थित होते.
यानंतर श्री देव कळेश्वर विद्यामंदिर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरपंच गुणाजी गावडे उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी सभापती रमेश गावकर, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील गावडे, पुंडलिक देऊलकर, संतोष गावडे, मुख्याध्यापक अरविंद सरनोबत, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेत्ये येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांचे ग्रामस्थांनीही कौतुक केले.
दरम्यान, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील गावडे यांचा वाढदिवसही याच दिवशी असल्याने उपस्थित मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी श्री देव कलेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली.



