सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील व्याघ्र कॉरिडॉरमधील वृक्षतोड प्रकरण तापले! ; उच्च न्यायालयात ‘वनशक्ती’ने दाखल केली अवमान याचिका!, इको-सेंसिटिव्ह क्षेत्रातील वृक्षतोडीवर न्यायालयाचा धाक!

सावंतवाडी : सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील व्याघ्र कॉरिडॉरमध्ये वृक्षतोडीसह पर्यावरणावर आघात होईल असे कृत्य झाल्याचा आरोप करत केंद्र, राज्यासह प्रशासनातील महसूल आणि वनविभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर ‘वनशक्ती’ संस्थेने अवमान याचिका दाखल केली आहे. कोलझर आणि सरमळे या इको-सेंसिटिव्ह एरियामध्ये झालेल्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
​कोलझर (ता. दोडामार्ग) येथे गावाबाहेरील काही लोकांनी जमिनी खरेदी करून वृक्षतोडीसह बेकायदेशीर उत्खनन केल्याचा प्रकार स्थानिकांनी प्रकाशात आणला होता. शिवाय सरमळे (ता. सावंतवाडी) येथेही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली होती. या पार्श्वभूमीवर वनशक्ती संस्था आणि त्या संस्थेचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी ही याचिका दाखल केली.
​केंद्राचे पर्यावरण व वन मंत्रालय, राज्याचे पर्यावरण तसेच वन व महसूल सचिव, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या विरोधातील या याचिकेतील आशय असा : या दोन्ही तालुक्यातील समृद्ध पर्यावरणामुळे या ठिकाणी वाघासह इतर वन्य प्राण्यांचा कॉरिडॉर आहे. याच्या संवर्धनासाठी या क्षेत्राला इको-सेंसिटिव्ह एरिया म्हणून घोषित करण्याची मागणी वनशक्ती संस्थेने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. यावर २२ मार्च २०२४ ला मुंबई उच्च न्यायालयाने इको-सेंसिटिव्ह एरियाची अंतिम अधिसूचना जारी होईपर्यंत या भागात वृक्षतोडीला आणि पर्यावरणाला घातक कामांना पूर्ण बंदी जारी केली होती. याच्या अंमलबजावणीची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, सावंतवाडी उपवनसंरक्षक आणि सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांवर दिली होती. यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देशही होते.

(कोलझर येथील वृक्षतोडीचे संग्रहित छायाचित्र)
​असे असताना याचिकाकर्ते जानेवारीमध्ये या भागात पाहणीसाठी गेले असता सरमळे आणि कोलझर येथे पर्यावरणावर आघात होईल अशी वृक्षतोड व उत्खनन झाल्याचे लक्षात आले. माहितीच्या अधिकारात घेतलेल्या माहितीवरून टास्क फोर्सने केलेल्या कामातही त्रुटी आढळल्या. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचे या याचिकेत म्हटले आहे. न्यायालयाचा स्पष्ट बंदीचा आदेश असतानाही घडलेल्या या प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

“दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील या समृद्ध पर्यावरण असलेल्या क्षेत्रावर दिल्ली लॉबीसह इतर जमीन माफियानी वक्रदृष्टी फिरवली आहे. स्थानिकांनी पिढ्यानपिढ्या जपलेल्या निसर्गावर बुलडोझर चालवणाऱ्या अशा गुंतवणूकदारांना त्याची किंमत चुकवावी लागेल. कारण आम्ही या संवेदनशील क्षेत्रातील इतर वृक्षतोडीची प्रकरणेही हाती घेत आहोत. या भागातील निसर्ग आणि त्याला जोडलेले येथील स्थानिकांचे लोकजीवन अधिक समृद्ध करण्यासाठी वनशक्तीचे हे प्रयत्न आहेत!”


स्टॅलिन दयानंद – संचालक, वनशक्ती.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles