नागपूर : समाजसेवा, शिक्षण, आरोग्य आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद सुलोचना श्रीराम कुबल यांना प्रतिष्ठेचा ‘ऑरेंज सिटी आयकॉन अवॉर्ड २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नागपूर येथील अमृत भवन हॉलमध्ये झालेल्या भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मानाला विशेष उंची मिळाली ती म्हणजे पद्मभूषण बाबा आमटे आणि मंदाताई आमटे यांचे निकटवर्तीय सहकारी तसेच इन्फंट इंडिया संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ समाजसेवक दत्ता बर्गजे आणि सौ. संध्या बर्गजे यांच्या हस्ते दयानंद कुबल यांचा गौरव करण्यात आला. आदिवासी समाज आणि एचआयव्ही बाधित बालकांच्या सेवेसाठी आयुष्याची पाच दशके वाहिलेल्या या समाजसेवी दांपत्याच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना तो क्षण आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय आणि प्रेरणादायी असल्याची भावना दयानंद कुबल यांनी व्यक्त केली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना ते म्हणाले, “पद्मभूषण बाबा आमटे यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचे भाग्य मला लाभले नाही. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारताना तो स्वतः बाबा आमटे यांनीच दिल्याचा आनंद मला झाला. हा पुरस्कार माझ्यासाठी सन्मान नसून समाजाप्रती अधिक जबाबदारीने कार्य करण्याची नवी प्रेरणा आहे.”
दयानंद कुबल यांच्या नेतृत्वाखाली कोकण संस्था शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार मार्गदर्शन, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिरे तसेच विविध लोककल्याणकारी उपक्रम प्रभावीपणे राबवत आहे. समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करत त्यांनी कोकण संस्थेला विश्वासार्ह आणि लोकाभिमुख व्यासपीठ म्हणून राज्यभरात वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करत २०३० पर्यंत ३० लाख नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकासाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोकण संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
दयानंद कुबल यांच्या कार्याचा गौरव यापूर्वीही सर रतन टाटा एक्सलन्स अवॉर्ड, सकाळ मीडियाचा ‘ब्रँड ऑफ कोकण’, कोकण सन्मान, युवा सामाजिक कार्यकर्ता यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील कोकण संस्थेलाही सहा राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून, संस्थेने सामाजिक क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता आणि सेवाभावाची भक्कम ओळख निर्माण केली आहे.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक दत्ता बर्गजे यांनी दयानंद कुबल यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत, “समाजपरिवर्तनासाठी नव्या पिढीने जिद्द, समर्पण आणि प्रामाणिकपणे काम कसे करावे, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे दयानंद कुबल,” असे गौरवोद्गार काढले.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. शेकडो सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाने समाजसेवेच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
ऑरेंज सिटी आयकॉन अवॉर्ड २०२६ मिळाल्यानंतर राज्यभरातून दयानंद कुबल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून समाजहितासाठी निःस्वार्थपणे झटणाऱ्या प्रत्येक सेवाभावी कार्यकर्त्याच्या कार्याचा गौरव आहे, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.



