सावंतवाडी : भविष्यातील सक्षम, जबाबदार आणि राष्ट्रनिष्ठ नेतृत्व घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत भोसले नॉलेज सिटी अंतर्गत कार्यरत यशवंतराव भोसले सैनिक स्कूल व इंटरनॅशनल स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थी परिषद शपथविधी व पदग्रहण सोहळा अत्यंत दिमाखदार, प्रेरणादायी आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. नेतृत्व, संघभावना, जबाबदारीची जाणीव आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांचा संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. स्वागतगीत, आकर्षक संचलन, विद्यार्थी प्रतिनिधींचा गौरव, शपथविधी आणि दहावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आली. नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रामाणिकपणा, निष्ठा, शिस्त आणि समर्पणाच्या भावनेने आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. त्या क्षणी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
कारगिल विजय दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावून गेले. त्यानंतर कारगिल युद्धात मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांना भावपूर्ण मानवंदना अर्पण करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यशवंतराव भोसले सैनिक स्कूल आणि इंटरनॅशनल स्कूलच्या विविध हाऊस, विभाग तसेच हेड बॉय-हेड गर्लसह नव्याने निवड झालेल्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींनी आत्मविश्वासाने पदभार स्वीकारत विद्यालयाच्या प्रगतीसाठी सर्वोत्तम योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रेरणादायी सोहळ्यास श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. अस्मिता सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, मुख्य कार्यकारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल (डॉ.) रत्नेश सिन्हा, वायबीआयटीचे प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसल, वायबीसीपीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप, यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचे प्राचार्य सॅव्हिओ फर्नांडिस, इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रियांका देसाई तसेच उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. नेतृत्व, शिस्त, जबाबदारी आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारा हा शपथविधी सोहळा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय टप्पा ठरला, अशी भावना उपस्थित मान्यवर आणि पालकांनी व्यक्त केली.



