सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे एरंडवाकवाडी येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आज एका अज्ञात इसमाने एक गाय आणि चार बैल आणून बेवारस सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही जनावरे सध्या महामार्गावर मुक्तपणे फिरत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, अपघाताचा धोका वाढला आहे.
याशिवाय ही जनावरे परिसरातील शेतकऱ्यांनी नुकत्याच केलेल्या भातलावणीवर ताव मारत असल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सध्या जनावरांची टेम्पोमधून वाहतूक करण्यावर असलेल्या निर्बंधांमुळे अशा प्रकारे विविध गावांमध्ये बेवारस जनावरे सोडून देण्याचे प्रकार वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन जनावरांची व्यवस्था करावी तसेच जबाबदार व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून होत आहे.



