संस्कृतमध्ये शतकी कामगिरी! ; मयुरी सावंत व कोमल सुर्वे यांना कै. नारायण लक्ष्मण आपटे पुरस्कार.

कनेडी : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (फेब्रुवारी-मार्च २०२६) मध्ये कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी यांनी १०० टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. याचबरोबर संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून कु. मयुरी महेश सावंत आणि कु. कोमल संजय सुर्वे यांनी विशेष यश संपादन केले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दोन्ही विद्यार्थिनींना कै. नारायण लक्ष्मण आपटे स्मृतीप्रित्यर्थ श्रीमती उषःप्रभा नारायण आपटे पुरस्कृत संस्कृत विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते, संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत व संचालक मंडळाच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारामध्ये रोख रक्कम रु. ५००, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छाचा समावेश होता.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. प्रदीप ढवळ म्हणाले, “संस्कृत आहे तर संस्कृती आहे. संस्कृत ही भारताची ज्ञानभाषा असून प्रत्येक भारतीयाची शान आहे. कनेडीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवतात, ही अत्यंत कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे.”

संस्कृत विषयात अथर्व गंगाराम तांबे आणि रिद्धी रविकांत पेंडुरकर यांनी ९९ गुण मिळवले. तसेच आर्या प्रदीप सावंत (९७), कृपा अनिल पेडणेकर (९७), दिव्या रेश्मा मेस्त्री (९६), हर्ष दर्शन म्हापसेकर (९४), तनिष्का बाळकृष्ण सांगवेकर (९४), गुंजन गोपाळ पारकर (९४), प्राची महाबळेश्वर देसाई (९२) आणि वल्लरी निलेश राणे यांनीही संस्कृत विषयात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

विशेष म्हणजे, प्रशालेत संस्कृत विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, सर्व संचालक, शालेय समितीचे चेअरमन आर. एच. सावंत, खजिनदार गणपत सावंत, समिती सदस्य, मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले. या यशामागे संस्कृत विषयाचे अध्यापक मकरंद आपटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles