✍️ लखन आडेलकर.
सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल गावातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस व सततच्या हवामान बदलामुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी शासनाने मंजूर केलेली नुकसानभरपाई तातडीने वितरित करावी, अन्यथा येत्या ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावातील सर्व शेतकरी कुटुंबासह बेमुदत आमरण उपोषणास बसतील, असा इशारा माडखोल ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे माडखोल परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. याची दखल घेत शासनाने नुकसानभरपाई मंजूर केली आहे.
मात्र, गावातील श्री. भगवान सिताराम राणे यांनी कौटुंबिक वादातून प्रेरित होऊन २२ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज सादर करून शासनाची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित तक्रारीत स्थानिक ग्राममहसूल अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांनी सुमारे २५० ते ३०० अर्जांपैकी जवळपास १०० अर्ज बोगस असल्याचे नमूद केल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर माडखोल गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, स्थानिक ग्राममहसूल अधिकारी, कृषी अधिकारी, पंच आणि शेतकरी यांच्या उपस्थितीत तब्बल २४७ शेतकऱ्यांचे पंचनामे, जबाब, पंचयादी तसेच प्रत्यक्ष शेतपाहणी करून सर्व प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार पूर्ण करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
अशा परिस्थितीत एका व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थासाठी संपूर्ण प्रक्रिया बोगस व चुकीची असल्याचा आरोप करणे हे सर्व शेतकरी तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर अन्याय करणारे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे मंजूर झालेली नुकसानभरपाई तात्काळ वितरित करावी आणि स्थानिक ग्राममहसूल अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांवर कोणतीही अन्यायकारक कारवाई करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माडखोल गावातील सर्व शेतकरी आपल्या कुटुंबीयांसह बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात करतील, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी माडखोल सोसायटीचे चेअरमन व माजी उपसरपंच जी. जी. राऊळ, माजी सरपंच राजन राऊळ, बाळू शिरसाट, सोसायटी संचालक प्रकाश नाईक, आनंद राऊळ, सत्यवान राऊळ, सुबोध राऊळ, पांडुरंग राऊळ, मोहन राऊळ, मनोज राऊळ, स्वप्निल राऊळ, विनेश तावडे, बंटी सावंत, लखन आडेलकर आणि स्वप्निल आडेलकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.



