पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अटकेत. ; कुडाळ पोलिसांची कारवाई.

कुडाळ :  कुडाळ शहरातील गणेशनगर परिसरात पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी पतीला अटक केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला उद्या (बुधवारी) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
कुडाळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी फिर्यादी भूषण सुभाष सांगेलकर (वय ३९, रा. सांगेली, ता. सावंतवाडी, सध्या डोंबिवली पूर्व) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे माहेरचे नाव सोनाली सुभाष सांगेलकर (वय ३६) असून, विवाहानंतर तिचे नाव तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर असे झाले होते. ती फिर्यादीची धाकटी बहीण होती.
सुमारे १५ वर्षांपूर्वी तन्वी यांचा सिद्धिविनायक विष्णू कुडाळकर (वय ४२, रा. गणेशनगर, कुडाळ) याच्याशी प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत चालला; परंतु संशयित आरोपीचे एका अन्य महिलेशी संबंध असल्याचा संशय तन्वी यांनी व्यक्त करून त्याबाबत विचारणा केल्यावर संशयित आरोपी त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करू लागला, असा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, संशयित आरोपी पत्नीवर सतत संशय घेऊन तिला शिवीगाळ व मारहाण करत असे. तसेच, माहेरच्या आई-वडील, भाऊ आणि इतर नातेवाईकांशी संपर्क ठेवण्यास मज्जाव करत त्याने भावाचा मोबाईल क्रमांकही ब्लॉक केला होता. १८ जून २०२६ पासून आरोपीच्या छळाचे आणि संशयाचे प्रमाण वाढल्याने तन्वी या तीव्र मानसिक तणावाखाली होत्या. या सततच्या त्रासाला कंटाळूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.


याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी संशयित आरोपी सिद्धिविनायक विष्णू कुडाळकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम १०८ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली आहे. आरोपीला उद्या न्यायालयात हजर केले जाणार असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरुदास पाडावे करीत आहेत.
दरम्यान, मृत तन्वी कुडाळकर यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून, या दुर्दैवी घटनेमुळे कुडाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles